चंद्रपूर : शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याने परिक्षेत आपल्याऐवजी आपल्या एका मित्राला पेपर देण्यासाठी पाठवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणातील दोषी विद्यार्थी लोकेश नागोसे हा परीक्षाकेंद्राऐवजी बाहेर फिरत असल्याचं ध्यानात येताचं हा प्रकार समोर आला आणि दोन्ही विद्यार्थी गजाआड झाले आहेत.
लोकेश नागोसे चंद्रपूरच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचा प्रथम वर्षाचा विद्यार्थी आहे. 27 एप्रिल रोजी लोकेशचा इंजिनिअरिंगच्या प्रथम वर्षाचा कम्यूनिकेशन हा पेपर होता. सकाळी 9.30 ते 12.30 या काळात लोकेश परीक्षा केंद्र असलेल्या चंद्रपूर शहरातील राजीव गांधी अभियांत्रिकी महाविद्यालयात सी टी-2 या इमारतीत पेपर सोडवत असणं अपेक्षित होतं, मात्र सर्व परीक्षार्थी आपला पेपर सोडवत असताना काही प्राध्यापकांना लोकेश बाहेर फिरताना दिसला. याचे कारण विचारल्यावर त्याने समाधानकारक उत्तर दिले नाही. प्राध्यापकांना शंका आल्याने त्यांनी लोकेशचा पेपर असलेला वर्ग शोधून तपासणी केली असता लोकेशच्या जागी अन्य एक विद्यार्थी पेपर सोडवीत असल्याचे निष्पन्न झाले.
दरम्यान लोकेशचा शोध घेतला असता तो याच परिसरातील एका प्रसाधनगृहात लपून बसला असल्याचे लक्षात आले. परीक्षा नियंत्रकांनी सहकाऱ्यांच्या मदतीने त्याला बाहेर काढत सत्य जाणून घेतलं. यात शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचा चौथ्या सेमिस्टरचा विद्यार्थी असलेला आदित्य मडावी या मित्राला आपण पेपर सोडविण्यासाठी बसविले असल्याचं लोकेशनं कबुल केलं आहे.