या संदर्भात कॉलेज प्रशासनाच्या वतीने हे आरोप धादांत खोटे असल्याचा खुलासा करण्यात आला आहे. सकाळपासून विद्यार्थ्यांची पूर्व परीक्षा होती. पेपर रद्द केल्याचे मेसेज खोटे असल्याचं कॉलेज प्रशासनाकडून सांगण्यात आलंय. पण यामुळे नव्या वादाला तोंड फुटलं आहे.
संगमनेरात जनसंघर्ष यात्रेत गर्दी दिसावी यासाठी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची परीक्षा पुढे ढकलली असून विद्यार्थ्यांनी काँग्रेस जनसंघर्ष यात्रेत उपस्थित रहावे, या प्रकारचे मेसेज सोशल मीडियावर व्हायरल झाले. अभाविपचे इशान गणपुले यांनी या प्रकरणाची चौकशी करून कारवाई करण्याचं निवेदन कॉलेज प्रशासनाला दिलं.
''कॉलेजच्या शिक्षण मंदिरात राजकारण केलं जात असून एनएसयूआयकडून हे राजकारण सुरू आहे. माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या अधिपत्याखाली हे कॉलेज असल्याने विद्यार्थ्यांना केवळ गर्दी करण्यासाठी वापर करून त्यांच्या भवितव्याशी खेळ केला जातोय,'' असा आरोप अभाविपने केला आहे.
कॉलेजने दिलेल्या स्पष्टीकरणानुसार, जनसंघर्ष यात्रेला एकही विद्यार्थी नव्हता आणि कॉलेज प्रशासनाने कोणतीही परीक्षा पुढे ढकलली नाही. केवळ राजकीय फायद्यासाठी असे खोटे आरोप केले जात असल्याचं अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे जनसंपर्क अधिकारी नामदेव कहांडळ यांनी स्पष्ट केलं.
बातमीचा व्हिडीओ :