अमरावती : अकरावीत विज्ञान शाखेत प्रवेश मिळवल्यानंतर शिक्षणाला लागणाऱ्या 60 हजार रुपयांसाठी एका अल्पवयीन मुलाने स्वत:च्याच शाळेत चोरी केली. नवोदय विद्यालयातून एकूण 40 लॅपटॉप त्याने पळवले. या विद्यार्थ्याला त्याच्या भावासह इतर तीन जणांनी साथ दिली. पोलिसांनी सर्व जणांना अटक केली आहे.


ज्याने लॅपटॉपची चोरी केली, त्या विद्यार्थ्याने नवोदय महाविद्यालयात पाचवीपासून शिक्षण घेतलं. सीबीएससीमधून 10 वीपर्यंत शिक्षण पूर्ण करुन दहावीत 92 टक्के मिळवले. पुढे एका प्रतिष्ठित कॉलेजमध्ये विज्ञान शाखेत अकरावीच्या शिक्षणासाठी प्रवेश मिळवला. या विद्यार्थ्याची घरची स्थिती अत्यंत हालाखाची आहे.

अकरावीच्या विज्ञान शाखेत शिकत असताना, पैशाची गरज भासू लागली. 60 हजार रुपये इतकी रक्कम कुठून आणायची म्हणून ज्या शाळेत शिक्षण घेतलं, त्या शाळेतील कॉम्प्युटर विभागातील लॅपटॉप चोरण्याचं त्याने ठरवलं आणि भावासह इतर मित्रांना सोबत घेऊन चोरी केली.

शाळेच्या दुसऱ्या मजल्यावर म्हणजे जमिनीपासून 30 फुटांवर पाईपने चढून, वर्गाच्या खिडकीची गज कापून, एकूण 40 लॅपटॉपची चोरी या विद्यार्थ्यांनी केली.

विशेष म्हणजे या मुलाने ज्या शाळेत चोरी केली, त्याच शाळेत तो दहावीत 92 टक्के मिळवून पास झाला होता.

हा विद्यार्थी चोरी करेल, यावर विश्वास बसत नाही, अशी प्रतिक्रिया शाळेचे प्रिन्सिपल रावसाहेब गवई यांनी दिली.

चोरीची घटना दिवाळीच्या सुट्टीत घडली. सुट्टी संपल्यानंतर नवोदय विद्यालयाच्या प्राचार्यांनी पोलिसात तक्रार केली, त्यानंतर संपूर्ण घटना समोर आली. पोलिसांनी अल्पवयीन मुलासोबत इतर तिघांना अटक केली आहे. त्यांच्याकडून 22 लाखांचे लॅपटॉपसुद्धा जप्त केले.