मुंबई: शाळेतील मुलं दोन आघाड्यावर लढत आहेत, एकीकडे कोरोनाची परिस्थिती तर दुसरीकडे दोन वर्षांपासून शिक्षणामध्ये निर्माण झालेली पोकळी. असं असताना आता मुलांना भडकावून त्यांना रस्त्यावर आणू नये, काही सूचना करायची असेल तर ती राज्य सरकारशी करावी असं आवाहन शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी केलं आहे. 


दहावी-बारावीच्या परीक्षा या ऑनलाईन घ्या या मागणीसाठई मुंबई, नागपूर, उस्मानाबाद यासह अनेक ठिकाणी आज विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं. त्यावर बोलताना वर्षा गायकवाड म्हणाल्या की, मुलांची सुरक्षा आणि आरोग्य ही आमची प्राथमिकता आहे. त्यामुळे दहावी-बारावीच्या मुलांच्या परीक्षेसंबंधी काही सूचना असतील तर त्या शिक्षण विभागाला कराव्यात. सरकार या संबंधी चर्चेसाठी तयार आहे. परंतु अशा पद्धतीने मुलांना कोणी रस्त्यावर उतरवू नये.


या आंदोलनामागे ज्या कोणत्या संघटना आहेत किंवा जे कोणी व्यक्ती आहे त्यांनी त्यांच्या काही सूचना असतील तर सरकारला कराव्यात, सरकार चर्चेसाठी तयार असल्याचंही वर्षा गायकवाड यांनी सांगितलं. 


राज्यातील कोरोनाचा संसर्ग कमी होत असल्याचं कारण देऊन दहावी-बारावीच्या परीक्षा ऑफलाईनच होणार, असं शालेय शिक्षण विभागाकडून काही दिवसांपूर्वी स्पष्ट करण्यात आलं होतं. मात्र, दहावी-बारावीच्या परीक्षा रद्द करण्याच्या मागणीसाठी आज अचानक शेकडो विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत. नागपूर, अकोला, औरंगाबाद आणि पुण्यासह अनेक ठिकाणी शेकडो विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन आंदोलन सुरू केलंय. हिंदुस्थानी भाऊचा चार दिवसांपूर्वी एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडिओनंतरच विद्यार्थी आक्रमक झाल्याचं बोललं जातंय.


संबंधित बातम्या:



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha