नंदुरबार : नंदुरबारमध्ये चार कुत्र्यांच्या हल्ल्यात आश्रमशाळेतील एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना समोर आली आहे. नवापूर तालुक्यातील घनराट येथील शासकीय माध्यमिक आश्रमशाळेत ही घटना घडली. पाचवीत शिकणाऱ्या अनिकेत नाईकचा कुत्र्यांच्या हल्ल्यात मृत्यू झाला आहे.


रविवारी संध्याकाळी अनिकेतवर आश्रमशाळेमागे उष्टे अन्न खायला आलेल्या 4 कुत्र्यांनी हल्ला केला होता. यामध्ये तो गंभीर जखमी झाला होता. हल्‍ल्‍यानंतर शासकीय माध्यमिक आश्रमशाळेतील मुख्याध्यापक व अधीक्षकांनी अनिकेतला तात्काळ नवापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केलं.


नवापूर उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी अनिकेतला नंदुरबार जिल्हा रुग्णालयात हलवण्‍यात आलं होतं. या हल्ल्यात अनिकेतच्या हाताच्या रक्तवाहिन्या फाटल्या होत्या.


अनिकेतवर शस्त्रक्रिया करण्यात आली, मात्र त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेनंतर परिसरात भीतीचं वातावरण आहे. नवापूर तालुक्यात वाढते कुत्र्यांचे प्रमाण जीवघेणे ठरत असल्याने प्रशासनाने योग्य खबरदारी घ्यावी, अशी मागणी आता पालकांकडून होत आहे.