जालना : औरंगाबादमधील वाळूज औद्योगिक वसाहतीमधील तोडफोड लेबर कॉन्ट्रॅक्टर, सप्लाय चेनमधील लोक आणि परप्रांतियांनी केली असून, त्याचं बिल मराठा आंदोलकांवर फोडला जातोय, असा आरोप आमदार हर्षवर्धन जाधव यांनी केला आहे. तसेच, तोडफोड करणाऱ्या समाजकंटकांनी स्वतःचे प्रायव्हेट इश्यूज सेटल करण्याच्या उद्देशाने हे कृत्य केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. आमदार हर्षवर्धन जाधव आज जालना येथील पत्रकार परिषदेत बोलत होते.


“15 ऑगस्ट रोजी ध्वजारोहण पालकमंत्र्यांनी करु नये, तर तो प्रशासकीय अधिकाऱ्यांनी करावा, अशी मागणी मराठा आंदोलकांची असून, सरकारने आणि नेत्यांनी स्वतःला आवरुन यावेळचा झेंडावंदन टाळावं”, अशी मागणी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी केली आहे. तसेच, “अनेक आंदोलकांनी जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांना पत्र लिहून पालकमंत्र्यांनी ध्वजारोहण केल्यास आत्महत्या करण्याची धमकी दिली असून त्यांच्या मनात चीड असल्याने सरकारने आपल्या मंत्र्यांना ध्वजारोहणाला जाऊ नका असे आदेश द्यावेत” अशी मागणीही हर्षवर्धन जाधवांनी केली आहे.

“मराठा आंदोलनादरम्यान शिवसेना जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांनी मराठा आंदोलकांना मारलेली लाथ चुकीची असून आंदोलकांनी फक्त उद्धव ठाकरे यांच्याच विरोधातच नाही, तर सर्वच नेत्यांच्या विरोधात घोषणाबाजी केली होती. त्यामुळे अंबादास दानवे यांनी थोडं समजूतदारणाने घ्यायला हवं होतं”, असंही शिवसेना आमदार हर्षवर्धन जाधव यांनी म्हटल आहे.

वाळूज तोडफोड प्रकरण

वाळूज एमआयडीसीतील 50 कंपन्यांचे पंचनामे पूर्ण झाले असून, 60 कोटींपेक्षा अधिकचे नुकसान झाले आहे. अनेक कंपन्यांचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. या तोडफोड प्रकरणी आतापर्यंत 47 जणांना ताब्यात घेतलं असून, 37 जणांवर अटकेची कारवाई केली आहे.