शिर्डी : कॉलेजमध्ये दिल्या जाणाऱ्या रक्तवाढीच्या गोळ्यांचा ओव्हरडोस झाल्यामुळे विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याचा संशय आहे. अतिरिक्त गोळ्या दिल्यामुळे आपल्या मुलाचा जीव गेल्याचा आरोप पालकांनी केला आहे.


संगमनेर तालुक्यातील राजापूरमध्ये ही घटना उघडकीस आली आहे. 17 वर्षीय प्रणित गुंजाळचा यामध्ये मृत्यू ओढावला आहे. दोन दिवसांच्या उपचारांनंतर प्रणितची प्राणज्योत मालवली.

दर सोमवारी सहावी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना फॉलिक अॅसिडची एक-एक गोळी दिली जाते. रक्तवाढीसाठी संबंधित गोळ्या कॉलेजतर्फे दिल्या जात असल्याची माहिती आहे. याच गोळ्यांच्या ओव्हरडोसमुळे प्रणित गुंजाळचा मृत्यू झाल्याचा दावा पालकांनी केला आहे.

दोन दिवसापासून प्रणितवर उपचार सुरु होते. मात्र प्रणितकडे इतक्या गोळ्या कशा आल्या, हा प्रश्न उपस्थित होत आहे. दरम्यान चौकशी करुन कारवाई करण्याची मागणी पालकांनी केली आहे. मात्र पोलिसात अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही.