बेळगाव : 'शिवाजी महाराज की जय' अशी घोषणा देणाऱ्या विद्यार्थ्याला बेळगावातील मराठीद्वेष्ट्या शिक्षकाने मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बालदिनाच्या कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा सादर झाल्यानंतर संबंधित विद्यार्थ्याने जयजयकार केला होता.

या घटनेची माहिती मिळाल्यावर महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या कार्यकर्त्यांनी शाळेत जाऊन मारहाण करणाऱ्या शिक्षकाला जाब विचारला. आधी त्या शिक्षकाने काही घडलेच नसल्याचा आव आणला, मात्र अखेर त्याची पाठराखण करणाऱ्या मंडळींनी माफी मागितली. बेळगाव शहरातील भरतेश हायस्कूलमध्ये हा प्रकार घडला.

बालदिनाच्या कार्यक्रमात एका विद्यार्थिनीने शिवाजी महाराजांचा पोवाडा सादर केला. पोवाडा संपल्यावर पोवाडा ऐकून स्फूरण चढलेल्या एका विद्यार्थ्याने 'शिवाजी महाराज की जय', 'धर्मवीर संभाजी महाराज की जय', 'भारतमाता की जय' अशा घोषणा उस्फूर्तपणे दिल्या. या घोषणा ऐकून संबंधित मराठीद्वेष्ट्या शिक्षकाचे पित्त खवळले आणि त्याने घोषणा देणाऱ्या दहावीतील विद्यार्थ्याचे केस ओढून त्याला बुक्क्याने मारहाण केली.

अशा घोषणा दिल्यामुळे भेदभाव निर्माण होऊन दोन गटात तेढ निर्माण होते, अशी सारवासारव करण्याचा प्रयत्न जाब विचारण्यासाठी गेलेल्या युवा समितीच्या कार्यकर्त्यांसमोर शिक्षकाने केला. शिवाजी महाराज हे केवळ कोणत्या एका समाजाचे नाहीत, तर ते राष्ट्रपुरुष असल्याचं कार्यकर्त्यांनी सांगितलं. भविष्यात पुन्हा त्या विद्यार्थ्याला त्रास दिला गेला किंवा टार्गेट केले गेले, तर युवा समिती गप्प बसणार नाही, असा इशाराही कार्यकर्त्यांनी दिला. शाळेचे नाव खराब होत असल्यामुळे प्रकरण वाढवू नका, अशी विनंती केल्याने माफीनाम्यानंतर प्रकरण मिटवण्यात आले.