अहमदनगर : अहमदनगरचा माजी उपमहापौर श्रीपाद छिंदमचा निर्लज्जपणा पाहायला मिळत आहे. छिंदमने अहमदनगर महापालिका निवडणुकीसाठी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. श्रीपाद छिंदमने छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरल्याने राज्यभरात चांगलाच गदारोळ झाला होता.

छिंदमने फोन संभाषणात शिवरायांबद्दल अपशब्द काढल्याची ऑडिओ क्लीप वायरल झाल्यानंतर राज्यभर संताप व्यक्त केला गेला होता. त्यानंतर उपमहापौरपदी असलेल्या श्रीपाद छिंदमचं भाजपमधूनच निलंबन करण्यात आलं होतं. मनपाच्या महासभेत छिंदमचं नगरसेवकपद रद्द करण्याचा प्रस्ताव महासभेकडे सादर झाला होता.

छिंदमविरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याला तुरुंगवासही भोगावा लागला होता. छिंदमला सशर्त जामीन मंजूर झाल्यानंतर तो अज्ञातस्थळी गेला होता. राजकीय अकसापोटी मला गुंतवण्यात आल्याचं आपल्या जामीन अर्जात त्याने म्हटलं होतं.

श्रिपाद छिंदम निवडणूक लढवणार की नाही, याबाबत चर्चा सुरु होती. त्यातच अहमदनगर मधील प्रभाग क्रमांक 9 मधून त्याने अपक्ष उमेदवारीसाठी अर्ज दाखल केला. त्यामुळे अहमदनगरमध्ये राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

अहमदनगर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी रविवार, 9 डिसेंबर 2018 रोजी मतदान होणार आहे, तर मतमोजणी दुसऱ्याच दिवशी म्हणजे सोमवार, 10 डिसेंबर 2018 रोजी होईल.

काय आहे प्रकरण?

श्रीपाद छिंदमने एका कामासंदर्भात बांधकाम विभागाचे कर्मचारी अशोक बिडवे यांना फोन केला. यावेळी बोलताना छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरले. छिंदमने महाराजांबद्दल वापरलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली. त्यानंतर सर्वच स्तरातून छिंदमवर टीका सुरु झाली. 16 फेब्रुवारीला श्रीपाद छिंदम याला पोलिसांनी अटक केली होती.