मुंबई : कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण जग पुढे आले आहे. कोरोनाच्या रूग्णांची संख्या जास्त असलेल्या सर्वच देशांनी आता लॉकडाऊनचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता अनेक नागरिक हे इतर देशांमध्ये अडकून पडले आहेत. शिवाय यामध्ये परदेशात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या देखील लक्षणीय आहे. हे सारे विद्यार्थी आता मायदेशात परत येण्यासाठी प्रयत्नशील आहेत. भारतीय दूतावासाकडून देखील त्यांना मदतीचा हात पुढे होताना दिसत आहे.

दरम्यान, युरोपातील लॅटिव्हिया या देशात राज्यातील 8 विद्यार्थी लॉकडाऊनमुळे अडकले आहे. त्यांच्याकडील जीवनावश्यक वस्तुंचा साठा देखील संपला होता. त्यानंतर त्यांनी राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांना मदतीची मागणी केली. या विद्यार्थ्यांच्या साऱ्या परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर उदय सामंत यांनी भारतीय दूतावासाशी संपर्क साधला. किमान पुढचे 8 दिवस पुरतील एवढ्या जीवनावश्यक वस्तू यावेळी देण्यात आल्या आहेत. त्यानंतर या विद्यार्थ्यांनी उदय सामंत यांचे आभार मानले.

सध्या या ठिकाणी 38 विद्यार्थी शिक्षण घेत असून त्यामध्ये राज्यातील 8 विद्यार्थ्यांचा समावेश आहे. यापूर्वी देखील उदय सामंत यांनी सिंगापूर येथे अडकलेल्या राज्यातील विद्यार्थ्यांना मदतीचा हात देत त्यांना भारतात आणण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यावेळी देखील विद्यार्थ्यांनी उदय सामंत यांचे आभार मानले होते.

मुख्यमंत्री, पंतप्रधान यांना पत्र

दरम्यान, युरोपमध्ये अडकलेल्या या विद्यार्थ्यांना जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा करण्यात यावा. त्यांच्यावर लक्ष ठेवून त्यांचे हाल होणार नाहीत याची काळजी घ्यावी. शिवाय, त्यांना भारतात आणण्यासाठी देखील प्रयत्न करावेत अशा आशयाचं पत्र उदय सामंत यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिले आहे.

कोरोनाचं मोठं संकट

चीननंतर इटली आणि अमेरिकेत सध्या कोरोनानं हाहाकार मांडला आहे. जगाचा विचार करता लाखो लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर, देशात देखील 900 जण कोरोना बाधित असून राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा हा 181वर पोहोचला आहे. तर, दिवसभरात मुंबईत 28 नव्या रूग्णांची नोंद झाली आहे. कोरोनाच्या बाबतीत भारत सध्या दुसऱ्या स्टेजला आहे.सं

संबंधित बातम्या :

आधी जन्म कोरोना चाचणी किटचा, नंतर पोटातल्या बाळाला; पुण्यातील मराठमोळ्या महिलेची किमया

coronaLockdown | पत्नीसाठी 'त्या' वृद्धाने केला 70 किलोमीटर घोड्यावरून प्रवास

Taj Group provides Food | अहोरात्र झटणाऱ्या डॉक्टर, नर्स, कर्मचाऱ्यांना ताज ग्रुपकडून जेवणाची सोय