मुंबई : एसटी महामंडळामध्ये भरती झाल्यानंतर कर्मचाऱ्यांना सध्या एक वर्षापर्यंत कनिष्ठ वेतन श्रेणीवर काम करावे लागते. एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांची कनिष्ठ वेतनश्रेणीची ही पद्धत रद्द करण्यात आल्याची घोषणा परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी केली. या निर्णयाचा लाभ नव्याने भरती होणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांना होईल, असेही दिवाकर रावते यांनी सांगितले.


दिवाकर रावते म्हणाले की, “एसटी महामंडळात भरती होणाऱ्या कर्मचाऱ्यांना सध्या एक वर्ष कनिष्ठ वेतनश्रेणीवर काम करावे लागते. या काळात कमी वेतनामुळे त्यांना अनेक आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागते. या कर्मचाऱ्यांची होणारी आर्थिक कुचंबणा लक्षात घेता कनिष्ठ वेतन श्रेणीची पद्धती रद्द करण्यात येईल. या निर्णयावर संचालक मंडळाच्या येणाऱ्या बैठकीमध्ये शिक्कामोर्तब करण्यात येईल.”

“एसटीमध्ये पूर्वी नवीन कर्मचारी भरती झाल्यानंतर त्याला सुरुवातीची पाच वर्षे कनिष्ठ वेतनश्रेणीवर काम करावे लागत होते. तो कालावधी नंतर तीन वर्षावर आणण्यात आला. आपण तो कालावधी एक वर्षावर आणला. पण आता हा कालावधीही रद्द करण्यात येईल, एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांची कनिष्ठ वेतनश्रेणीची पद्धत रद्द करण्यात येईल. या निर्णयाचा लाभ नव्याने भरती होणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना होईल.”, असेही रावतेंनी सांगितले.