अमरावती : मातृत्त्व... निसर्गाने स्त्रीला दिलेलं वरदान. मात्र अमरावतीतील एका शाळकरी मुलीसाठी मातृत्त्व वरदान नव्हे तर शाप ठरला आहे. गावातील एका वासनांध सैतानाच्या अत्याचारामुळे 17 वर्षाच्या मुलीला इच्छेविरुद्ध बाळाला जन्म द्यावा लागला.


 

 

कुमारी माता हा नुसता शब्दच अस्पृश्य मानला जातो. मात्र हे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात, आदिवासी, मागासलेल्या भागातील जळजळीत वास्तव आहे. मात्र मेळघाटात 17 वर्षांच्या कुमारी मातेला बाळाच्या दुधासाठी 300 रुपयांना स्वत:चा मोबाईल विकावा लागला. इतकंच नाही तर बाळाच्या वडिलांचं नाव म्हणून स्वत:च्या वडिलांचं नाव लिहावं लागलं.

 

 

खरंतर या राणीचं (नाव बदललं आहे) शाळेत जाण्याचं वय. घरी अठराविश्व दारिद्र्य. शिकून आपल्या कुटुंबाला गरिबीच्या विळख्यातून सोडवण्याचं स्वप्न राणीने पाहिलं. पण, गेल्या वर्षी उन्हाळाच्या सुट्टीत राणी गावात आली आणि तिचं आयुष्य एका खडतर वळणावर येऊन पोहोचलं.

 

 

कारण गावात राहणाऱ्या दिनेश ठाकरेने तिच्यावर अतिप्रसंग केला. दिनेश ठाकरेमुळे राणीला दिवस गेले. राणीचे आई-वडील दाद मागण्यासाठी दिनेशच्या घरी गेले. राणीवर अत्याचार करणारा दिशेन धनाढ्याचा पोर. आई-बापाने पैशांच्या जोरावर मुलाच्या चुकांवर पांघरुन घातलं.

 

 

मात्र राणीच्या पदरात एका लेकराची जबाबदारी पडली. डॉक्टरने जेव्हा बाळाच्या पित्याचं नाव विचारलं, तेव्हा राणीने रकान्यात आपल्याच बापाचं नाव लिहिलं. आता या तान्हुल्या जीवाला वाढवण्यासाठी राणीचा संघर्ष सुरु आहे.

 

 

मुलाच्या जन्मानंतर पोलिसांनी राणीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या दिनेश ठाकरेवर बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. मात्र प्रकरणाचा तपास डीएनए रिपोर्ट अभावी खोळंबला आहे.

 

 

राणीची कैफियत घेऊन एबीपी माझाची टीम पोलीस अधीक्षकांकडे गेली. तूर्तास तरी एसपी लखी गौतम यांनी प्रकरणाच्या सखोल चौकशीचं आश्वासन दिलं आहे.

 

 

आता राणीला एक नव्हे तर तीन लेकरांना संभाळावं लागत आहे. कारण तिच्या भावाच्या पत्नीचा प्रसूती दरम्यान मृत्यू झाला. त्यामुळं भावाच्या दोन लेकरांची जबाबदारीही तिच्याच खांद्यावर आली आहे.