लातूर : रस्ता खराब असल्याने बस येत नाही. त्यामुळे तीन गावांतल्या विद्यार्थ्यांवर शाळेपासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. रस्ता दुरुस्तीचे काम पूर्ण होत नाही तोपर्यंत शाळा बंद राहणार आहे. शिक्षकांनी स्वखर्चातून भाड्याच्या खासगी वाहनाने विद्यार्थ्याची ने-आण सुरु केली आहे. मात्र या विद्यार्थ्यांनीच त्यावर उपायही शोधून काढला आहे. हे चिमुरडे थेट मुख्यमंत्र्याना पत्र लिहित आहेत.


 
हे विद्यार्थी टेम्पो आणि जीपमध्ये रोज प्रवास करतात. कारण रस्ता खराब असल्याने जाणवळाला एस टी बस येत नाही. कवठाळी ते जाणवळ ९ किलोमीटर, दवेली ते जाणवळ ६ किलोमीटर आणि आनंदवाडी ते जाणवळ १४ किलोमीटर रस्ता अतिशय खराब झाला आहे या तीन गावातील विद्यार्थ्याना पाचवी नंतर शिक्षण घ्यावयचे झाल्यास त्यांना जाणवळाला यावे लागते, मात्र एस टी बस येतच नाही रस्त्याचे कारण दिले जाते शेवटी ह्या गावातील विद्यार्थ्यानी आणि शिक्षकांनी एकत्र येत रस्ता दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे ते ही शाळा बंद ठेवून.

 
जानवळ येथील स्वामी विवेकानंद विद्यालय आणि सरस्वती विद्यालयच्या शिक्षकांनी महिना पस्तीस हजार रुपये स्वखर्चातून जीप आणि टेम्पोचे भाडे भरत आहेत. शेवटचा उपाय म्हणून ते मुख्यमंत्र्याना पत्र लिहणार आहेत

मा. मुख्यमंत्री,
देवेंद्र फडणवीसजी,
वर्षा बंगला, मलबार हिल, मुंबई
सप्रेम नमस्कार विनंती विशेष...
पत्रास कारण की,

शिक्षकांच्या शिक्षणाच्या वस्याबद्दल नेहमीच प्रश्न उपस्थित केले जातात. मुख्यमंत्री महोदय... आमच्या मुख्याध्यापकांची ही तळमळ पाहून कदाचित तुम्हाला तरी असे प्रश्न पडणार नाहीत. लातूर जिल्ह्यातील कवठाळी, दवेली आणि आनंदवाडी ही आमची गावं... शिक्षणाची सोय मात्र जाणवळला... जाणवळ कुणापासून 9 तर कुणापासून 14 किलोमीटर... तरी आम्हा विद्यार्थ्यांमधील शिकण्याची जिद्द कायम आहे. काल-परवापर्यंत तसं ठीक होतं. मात्र खराब रस्त्याचं कारण देऊन गावात येणारी एसटी बंद झाली आणि आमची परवड सुरु झाली...

 
गेलाबाजार दुष्काळानं आमच्या आई-बापांच्या डोळ्यात पाणी आणलं. आता कुठं पावसानं कृपा केलीय म्हणून ते कामाला लागलेत. तशात त्यांच्या मागं हे नवं बालंट उभं राहिलंय. मुख्यमंत्री महोदय, तुम्हीच सांगा कोणत्या मुलांना आपल्या आई-बापांचं हे दुःख सहन होईल... मग आम्ही काय आमची शाळा बंद करायची का?

 
मुख्यमंत्री महोदय, खरंतर आम्ही शिकावं, मोठं व्हावं म्हणून धडपडणाऱ्या शिक्षकांचं आणि आई बापांचं आम्हाला कौतुकच वाटतं. पण सरकारलाही खरंच तसं वाटतं का? किमान तुम्हालातरी???

 
तुम्ही खूप बिझी असता, पण वेळात वेळ काढून पत्राला उत्तर नाही दिलं तरी चालेल, पण रस्त्याची तेवढी व्यवस्था करा.

 
कळावे,
तुमचेच आज्ञाधारक,
विद्यार्थी