धुळ्यातील डॉक्टरला झालेल्या मारहाणीविरोधात हा संप पुकारला जाणार होता. पण कोर्टाच्या आदेशानंतर हा संप मागे घेण्यात आला आहे. मात्र, संप मागे घेतला असला तरी डॉक्टर शांततेनं निर्दशनं करणार आहेत.
विशेष म्हणजे मार्डचे डॉक्टर संप करणार नाहीत, असं मार्डनं कोर्टात याआधी सांगितलं आहे. ही बाब त्यांच्या लक्षात आणून देताच, मार्डनं प्रस्तावित संप मागे घेतला आहे.
काय आहे प्रकरण?
धुळे शहरातील साक्री रोडवर दुचाकी अपघातात शत्रुघ्न शिवाजी लष्कर हा तरुण गंभीर जखमी झाल्याने त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. यावेळी डॉ. महामुनकर यांनी या रुग्णाला न्यूरो सर्जनची आवश्यकता असल्याचे सांगितलं. मात्र, रुग्णालयात न्यूरोसर्जन नसल्यानं उपचाराअभावी शत्रुघ्नचा मृत्यू झाला असा आरोप त्याच्या नातेवाईकांनी केला. त्यानंतर संतप्त नातेवाईकांनी डॉ. महामुनकर यांना धक्काबुक्की करत मारहाण केली.
या मारहाणीत डॉ. रोहन महामुनकर यांच्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली. त्यामुळे त्यांचा डोळा निकामी होण्याची भीती व्यक्त होत आहे. आयएमएनेही या घटनेचा तीव्र शब्दात निषेध केला आहे. या प्रकरणी 9 जणांना अटक करण्यात आली आहे. आरोपींना 15 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान या प्रकरणी मार्डच्या निवासी डॉक्टरांनी संप पुकारला होता. मात्र, आता हा संप मागे घेण्यात आला आहे.
संशयिताचा गळफास
धुळ्यातील डॉक्टर मारहाण प्रकरणातील संशयित आरोपीने पोलिस कोठडीतच गळफास घेऊन आत्महत्या केली. प्रदीप सदाशिव वेताळ असं आत्महत्या करणाऱ्या आरोपीचं नाव आहे.
धुळे शहर पोलिस स्टेशनच्या लॉकअपमध्ये असलेल्या बाथरुममध्ये प्रदीप वेताळने गळफास घेतला.
संबंधित बातम्या:
इंजिनिअरच व्हायला हवं होतं, धुळ्याच्या 'त्या' डॉक्टरची उद्विग्नता
धुळे डॉक्टर मारहाण : संशयित आरोपीचा पोलिस कोठडीत गळफास
धुळ्यात जबर मारहाणीत डॉक्टरचा डोळा निकामी होण्याची भीती