गोंदिया : गोंदियाच्या देवरी तालुक्यातील डोंगरगावाला चक्रीवादळाचा तडाखा बसला आहे. डोंगरगावातील तब्बल 30 घरांचा काही भाग आणि छत कोसळले आहे. तसेच एका ठिकाणी छत कोसळून एक बैल मृत्यूमुखी पडला आहे. गुरुवारी रात्रीपासूनच गावातील वीज पुरवठा खंडीत झाला आहे. काल दिवसभरात गावातील स्थानिक तलाठी आणि मंडल अधिकारी यांनी नुकसानीचे पंचनामे केले आहेत.
गेल्या दोन दिवसापासून गोंदिया जिल्ह्यातील अनेक तालुक्यात मोठ्या प्रमाणात पाऊस सुरु आहे. काल रात्री देवरी तालुक्यातील डोंगरगाव येथे पावसासोबत आलेल्या चक्रीवादळामुळे मोठ्या प्रमाणात घरांचे नुकसान झाले.
देवरी तालुक्यातील डोंगरगाव येथे स्वातंत्र्यदिन साजरा केल्यानंतर गावात आनंदाचे वातावरण होते. अचानक सांयकाळी साडेपाच वाजण्याच्या दरम्यान आकाशात काळे ढग दाटून आल्यानंतर कोणाच्याही ध्यानीमनी नसताना या गावाला वादळाचा तडाखा बसला. बघता बघता अर्ध्या गावातील घरांचे छप्पर उडून गावकऱ्यांची दाणादाण उडाली. सुमारे अर्धातास चाललेलं हे निसर्गाचं तांडव गावात होत्याचं नव्हतं करुन गेलं. काही घरे तर अक्षरशः कोसळली.
शेतातील फळझाडे कोलमडल्याने शेतकरी चिंतेत आहेत. या गावातील ऐतिहासिक अशा डोये वाड्याला सुद्धा मोठ्या प्रमाणावर फटका बसला आहे.
गोंदियातील देवरीत चक्रीवादळाचा तडाखा
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
18 Aug 2018 07:37 AM (IST)
गेल्या दोन दिवसापासून गोंदिया जिल्ह्यातील अनेक तालुक्यात मोठ्या प्रमाणात पाऊस सुरु आहे. काल रात्री देवरी तालुक्यातील डोंगरगाव येथे पावसासोबत आलेल्या चक्रीवादळामुळे मोठ्या प्रमाणात घरांचे नुकसान झाले.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -