Maharashtra: पालघर जिल्ह्याला वादळाचा जोरदार तडाखा बसला आहे, यात विविध गावांमध्ये जबर नुकसान झाले आहे. वाडा तालुक्यातील एका घराचे छत कोसळले असून यामध्ये एक महिला जखमी झाली. ठिकठिकाणी विजेचे खांब वाकून तारा तुटल्याने अनेक ठिकाणचा विद्युत प्रवाह खंडित झाला होता. सोसाट्याच्या वाऱ्यासह आलेल्या वादळामुळे अनेक ठिकाणी झाडे सुद्धा उन्मळून पडली आहेत. दुपारच्या वेळेस आलेल्या जोरदार धूळ मिश्रित वाऱ्याने नागरिकांची भांबेरी उडवली होती.


वादळाच्या तडाख्यात सापडून वाडा तालुक्यातील शेले दाढरे येथे एका घराचं मोठं नुकसान झालं आहे. अचानक आलेल्या वादळाच्या तडाख्याने घराचं छप्पर उडून गेलं असून यात शेवंती भीमा शनवारे या आजी जखमी झाल्या आहेत. शेले दाढरे येथील सरपंच किरण कवटे यांच्या घराचं नुकसान झालं असून सुदैवाने जीवितहानी झाली नसली, तरी या वादळाच्या तडाख्यात सापडलेलं संपूर्ण घर जमीनदोस्त झालं आहे. घरासह घरातील साहित्यांचंही मोठं नुकसान झालं असून शासनाने पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी कवटे कुटुंबीयांकडून केली जात आहे.


तीव्र वादळामुळे पालघर शहरात आणि शहरालगत पालघर नंडोरेजवळ मनोर लाईनचा विजेचा खांब पडल्याने मनोर वाहिनी संध्याकाळपर्यंत बंद करण्यात आली होती. पालघर शहरात सतत विजेचा लपंडाव सुरू होता. ग्रामीण भागात विजेच्या तारा झाडाजवळ असल्याने अनेक ठिकाणी वीज पुरवठा महावितरणकडून बंद ठेवण्यात आला होता. अनेक विजेचे खांब मधून वाकल्याने तारा ठिकठिकाणी लोंबकाळत पडल्या होत्या. ग्रामीण भागात काही ठिकाणी झाडं उन्मळून पडल्याच्या घटना देखील ठिकठिकाणी घडल्या. एकंदर सकाळपासून संध्याकाळपर्यंत जिल्ह्यात सोसाट्याचा वारा थांबायचे नाव घेत नव्हता, त्यामुळे रविवार असून देखील रस्ते सुनसान झाल्याचे पाहायला मिळाले.


मान्सून कोकणात धडकला, राज्यात पुढील 4 दिवस पावसाचा इशारा


मान्सूच्या पुढील प्रवासासाठी अनुकूल वातावरण तयार झालं आहे, त्यामुळे चार दिवसात मान्सून संपूर्ण महाराष्ट्र व्यापण्याची शक्यता आहे.


सोमवारी राज्यात कुठे पाऊस?


मुंबई, पालघार, ठाणे, नाशिक, अहमदनहर, सोलापूर, धाराशिव, लातूर, परभणी, बीड, जालना, नांदेड, हिंगोली, वाशिम, यवतमाळ, चंग्रपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा, नागपूर, वर्धा, अमरावती, अकोला, बुलढाणा, धुळे, जळगाव, नंदुरबार


मंगळवारी राज्यातील कोणत्या भागात पाऊस? 


मंगळवारी राज्यभरात हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस कोसळण्याची शक्यता आहे.  मराठवाड्यातील काही भाग आणि विदर्भाला वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आलाय. बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ, चंग्रपूर, गडचिरोल, गोंदिया, भंडारा, नागपूर या ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.


हेही वाचा:


Latur News: लातूरमध्ये चारा टंचाईच्या झळा... चारा महागला, जनावरे विक्रीसाठी बाजारात