धुळे : धुळे महानगरपालिकेच्या आयुक्त संगीता धायगुडे यांच्या निवासस्थानावर शुक्रवारी मध्यरात्री दगडफेक झाली़. याप्रकरणी देवपूर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


धुळे शहरातील मयूर कॉलनी परिसरातील उद्यानात महापालिका आयुक्तांचे निवासस्थान आहे. आयुक्त घरी असताना रात्री काही अज्ञात व्यक्तींनी आयुक्तांच्या निवासस्थानावर दगडफेक केली.

अतिक्रमण कारवाई, कामचुकार कर्मचाऱ्यांवर कारवाई, भोगवटा प्रमाणपत्र कारवाई या आयुक्तांनी सुरू केलेल्या कारवाईचा सध्या दबदबा असताना यातील काही विघ्नसंतोषी प्रवृत्तींनी दहशत माजवण्याच्या उद्देशानं आयुक्तांच्या घरावर दगडफेक केली आहे का? या दिशेने देखील पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

मनपा आयुक्त संगीता धायगुडे यांच्या निवासस्थानी ड्युटीवर असलेल्या कर्मचाऱ्यांच्या लक्षात हा दगडफेकीचा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी निवासस्थान परिसराची पाहणी केली. मात्र कोणीही दिसून आले नाही़.

दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारी सकाळी आयुक्तांनी या घटनेची माहिती जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे तसेच मुख्यमंत्री कार्यालयाला दिल्याच सूत्रांनी सांगितलं.

आयुक्तांच्या निवासस्थानाचे सुरक्षा कर्मचारी,आयुक्तांच्या संरक्षणार्थ असलेला पोलीस कर्मचारी, मनपा सहायक आयुक्त अनुप डुरे, अभियंता कैलास शिंदे यांनी देवपूर पोलीसात तक्रार दाखल केल्यानंतर अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.