सांगली : ऊस दरावरून सुरू असलेले आंदोलन हिंसक वळण घेत आहे. ऊस दरासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी रात्री उशिरा नवीन जिल्हाधिकारी कार्यालयावर दगडफेक केली. या दगडफेकीत कार्यालयाच्या खिडक्यांचं मोठं नुकसान झालं.
स्वाभिमानी शेतकरी संघटना, रघुनाथ पाटील यांच्या शेतकरी संघटनानी या दगडफेकीच्या घटनेची जबाबदारी स्वीकारली असून बाकी शेतकरी संघटनानी या घटनेचे समर्थनही केले आहे. शासन ऊस दराची कोंडी फोडत नसल्याच्या निषेधार्थ जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन करत शासनाचा निषेध करण्यात आला आहे.
हल्ला करून कार्यकर्ते पसार झाले. रात्री उशिरा विश्रामबाग पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली. या घटनेनंतर जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. दरम्यान ऊस दराच्या प्रश्नाबाबत खासदार राजू शेट्टी सांगलीत पत्रकार परिषद घेणार आहेत. त्यामुळे ते आता काय भूमिका घेतात याकडे सर्वांच लक्ष लागलं आहे.
एकीकडे कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व कारखाने बंद असताना, सांगली जिल्ह्यातील कारखाने बंद करावे अशी शासनाकडे मागणी केली आहे. मात्र त्यावर कारवाई केली जात नसल्याचा राग या आंदोलनातून व्यक्त केला जात आहे.
ऊसाला एफआरपी अधिक दोनशे रुपये असा दर मिळावा, या मागणीसाठी गेल्या 15 दिवसांपासून जिल्ह्यात आंदोलन सुरू आहे.
शेतकरी संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी निवेदने देऊन मोटारसायकल रॅली काढून कारखाने बंद ठेवण्याची मागणी कारखानदारांकडे केली होती. मात्र शेतकरी संघटनेच्या मागणीला कारखानदारांनी दाद न देता कारखाने सुरूच ठेवले. तसेच सरकार, प्रशासन यांनीही आंदोलनाकडे दुर्लक्ष केलं. त्यामुळे संघटनेच्या कार्यकर्त्यांनी तोडफोड, आंदोलन सुरू केले आहे.
वाळवा, पलूस, कडेगाव, मिरज या तालुक्यात उसाच्या वाहनाच्या टायर फोडून गळीत हंगामात अडथळा आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. दराचा तोडगा निघत नसल्यामुळे शेतकरी व कार्यकर्त्यांमध्ये असंतोष धुमसत आहे. या असंतोषाचा आज स्फोट झाला.