पंढरपूर : सातारा येथून सोलापूरकडे निघालेल्या एसटी बसवर पिलीव घाटात अज्ञातांकडून दगडफेक करण्यात आली. मात्र बसमध्ये एकही प्रवासी नसल्याने यात कोणी जखमी झाले नसले तरी बसमागून येणाऱ्या दुचाकीवरील दोघांना दगड लागून ते जखमी झाल्याचा प्रकार काल (19 जानेवारी) रात्री अकराच्या सुमारास घडला. सोलापूर जिल्ह्याच्या हद्दीत ही घटना घडली.
ही बस सातारा-पंढरपूर रस्त्यावरील म्हसवड नजिकचा पिलीव घाट उतरत होती. त्यावेळी शेवटच्या वळणाजवळ झाडीत दबा धरुन बसलेल्या काही लोकांनी बसवर दगडे फेकण्यास सुरुवात केली. बस चालक जीवराज कदम यांनी प्रसंगावधान दाखवत बस न थांबवता पुढे नेली. यावेळी बसमध्ये वाहक आणि चालकाशिवाय एकही प्रवासी नसल्याने या बसच्या काचा फुटल्या तरी कोणी प्रवासी जखमी झाले नाही. परंतु बसमागून येणाऱ्या दुचाकीलाही दगड लागल्याने दोघे जखमी झाले. ते दोघेही उपचारासाठी अकलूज येथे निघून गेले.
घाट उतरल्यानंतर बस चालक आणि वाहकाने घाटात जाणारी इतर वाहने थांबवली. याची माहिती पोलिसांना देण्यात आली. यानंतर म्हसवड आणि माळशिरस पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घाटात पोहोचून पोलिसांनी शोधमोहीम सुरु केली. ज्या पद्धतीने ही दगडफेक झाली त्यावरुन हा लुटमारीचा प्रकार असण्याची शक्यता आहे. परंतु या घटनेत कोणालाही लुटण्यात आलेले नाही. दगडफेक करुन अज्ञात तरुण पळून गेल्याने आता पोलीस त्यांचा सर्व परिसरात शोध घेऊ लागले आहेत.
या घटनेत चोरी झालेली नाही. कोणीही भयभीत होण्याचं कारण नाही. मात्र लवकरच परिसरात कोम्बिंग ऑपरेशन राबवणार असल्याची माहिती साताऱ्याचे पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी दिली.