मुंबई : सत्तास्थापनेवरुन शिवसेना-भाजपमधील कलगीतुरा संपण्याचं नाव घेत नाही. त्यामुळे भाजपशिवाय काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्यावर सत्तास्थापन करण्यासाठी शिवसेना प्रयत्न करत असल्याची चर्चा आहे. शरद पवारांनी 'आम्ही विरोधी बाकावरच बसणार', अशी भूमिका स्पष्ट केली आहे. तर भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेसने शिवसेनेला पाठिंबा द्यावा, अशी मागणी काँग्रेसमधील काही नेत्यांची आहे.


काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हुसेन दलवाई यांनी याबाबत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र लिहिले आहे. त्यामध्ये दलवाई यांनी म्हटले आहे की, महाराष्ट्रात सत्ता स्थापन करण्यासाठी शिवसेनेकडून प्रस्ताव आल्यास काँग्रेसने त्यांना पाठिंबा द्यावा.

दलवाई यांनी पत्रात म्हटले आहे की, भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेत खूप फरक आहे. त्यांचं राजकारण आता सर्वसमावेशक झालं आहे. त्यामुळे त्यांना आपण पाठिंबा देण्यास हरकत नाही. प्रतिभाताई पाटील आणि प्रणव मुखर्जी यांना काँग्रेसने जेव्हा राष्ट्रपतीपदासाठी उमेदवारी दिली होती, तेव्हा शिवसेनेने काँग्रेसच्या उमेदवारांना पाठिंबा दिला होता.

भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी शिवसेनेला पाठिंबा द्यायला हवा. भाजपचं राजकारण टोकाचं आहे. मॉब लिन्चिंगबाबतच्या त्यांच्या भूमिका चुकीच्या आहेत. असेही दलवाई यांनी पत्रात म्हटले आहे. दरम्यान, शिवसेनेला पाठिंबा देण्यावरुन काँग्रेसमध्ये दोन गट पडले आहेत. काल (01 नोव्हेंबर) काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे आणि संजय निरुपम यांनी काँग्रेसने शिवसेनेला पाठिंबा देऊ नये, अशी भूमिका मांडली

दरम्यान, विधासनभा निवडणुकीच्या मतमोजणीच्या दिवशी हुसेन दलवाई एबीपी माझाच्या चर्चासत्रात सहभागी झाले होते. विधासभेच्या निकालाची आकडेवारी स्पष्ट झाल्यानंतर सत्तास्थापनेबाबत बोलताना हुसेन दलवाई यांनी काँग्रेस शिवसेनेला पाठिंबा देऊ शकतं, असे संकेत दिले होते. कराड दक्षिण मतदारसंघातून विजयी झाल्यानंतर एबीपी माझाशी बोलताना काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीदेखील शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबत संकेत दिले होते.

शिवसेनेबाबत कॉंग्रेसचं वेट अँड वॉच, कॉंग्रेस नेते हायकमांडच्या भेटीसाठी दिल्लीला 



जाती-धर्माचं राजकारण करणाऱ्या पक्षाला पाठिंबा देणार नाही : सुशीलकुमार शिंदे
राज्यात कोणालाही स्पष्ट बहुमत मिळालेलं नाही. त्यामुळे फ्रॅक्चर्ड मॅनडेट आहे. काँग्रेस धर्मनिरपेक्ष पक्ष आहे. कोणत्याही धर्म आणि जातीवर राजकारण करणाऱ्या पक्षाला आम्ही पाठिंबा देऊ शकत नाही. काँग्रेसचे काही वरिष्ठ नेते दिल्लीला का गेले हे मला माहित नाही. आम्ही जनतेचा कौल मान्य करुन विरोधी पक्षात बसून जनतेची सेवा करायला तयार आहोत. सोनिया गांधींशी माझी चर्चा झालेली नाही, पण हे माझं वैयक्तिक मत आहे. मला पक्ष श्रेष्ठींनी विचारलं तर त्यांना मी कळवेन," असं सुशीलकुमार शिंदे म्हणाले.

पाहा काय म्हणाले सुशीलकुमार शिंदे?



भाजप-शिवसेनेच्या भांडणाला बळी पडू नका : निरुपम
"भाजप शिवसेनेचा तात्पुरता वाद केवळ सत्तेसाठी आहे. नंतर ते पुन्हा एकत्र येणार. त्यामुळे शिवसेना-भाजपच्या वादात काँग्रेसने पडू नये. सत्तेत आल्यानंतर ते परत एकत्र येतील आणि आम्हाला शिव्या घालतील. काँग्रेस नेते शिवसेनेला पाठिंबा देण्याचा विचार कसा करु शकतात?" असं ट्वीट संजय निरुपम यांनी केलं आहे.

शिवसेना-भाजपच्या तमाशात काँग्रेसने पडू नये- संजय निरुपम | मुंबई | ABP Majha