नाशिक : नाशिक जिल्ह्यातील मालेगावमध्ये कोरोनाबाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ झाली आहे. मालेगावमध्ये आणखी 13 नवीन रुग्ण आढळले आहेत. गेल्या 12 तासात मालेगावमध्ये 18 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. काल रात्री 12 वाजता 5 रुग्णाचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते, त्यानंतर पुन्हा 13 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. आजच्या 18 नव्या रूग्णांमुळे मालेगावमधील कोरोना बाधितांची संख्या 27 झाली आहे. त्यापैकी मालेगावमधील एका कोरोनाबाधिताचा मृत्यू झाला आहे.

आता नाशिक जिल्ह्यामध्ये कोरोनाबाधितांची एकूण संख्या 32 झाली आहे. नाशिक शहरात तीन, निफाड आणि चंदवडमध्ये प्रत्येकी एक-एक रूग्ण आढळला आहे. निफाडमधील एक रूग्ण पूर्णपणे बरा झाल्यामुळे त्याला होम क्वॉरंटाईनमध्ये पाठवण्यात आलं आहे. उत्तर महाराष्ट्रात मालेगाव हे कोरोनाचे केंद्र ठरत आहे. या परिसरात अतिशय दाटीवाटीने नागरी वस्ती आहे. या भागात आतापर्यंत 27 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. त्यातील दोघांचा मृत्यू झाला आहे. प्रशासनाने ताब्यात घेतलेल्या खाजगी रुग्णालयात शिफ्ट करणार आहेत. याआधी ज्या रुग्णांना कोरोना झाला त्यांच्या निकटवर्तीयांचा नवीन रुग्णात समावेश मालेगावात कोरोनाची लागण झपाट्यानं होत असल्याने आरोग्य विभागाची अतिरिक्त टीम नेमण्याची तयारी केली आहे.

मालेगावमध्ये जरी रुग्णसंख्या अचानकपणे वाढली असली तरी ते वाढलेले सर्व लोक हे मूळ बाधित व्यक्तीच्या कुटुंबातील किंवा अत्यंत जवळच्या संपर्कातील व्यक्ती आहेत त्यामुळे त्यांचे अहवाल पॉझिटिव्ह येणे जवळपास निश्चित होते. या सर्व लोकांना मूळ रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर आधीच वेगळे करण्यात आलेले आहे. ते इन्स्टिट्यूशनल क्वॉरंटाईन आहेत.

अजूनही लोकांनी सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळले व्यवस्थित पाळला तर या आजाराचा संसर्ग बाहेर होण्याचे टाळणे शक्य आहे, असं नाशिकचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी सांगितलं आहे. मालेगाव हे यंत्रमागाचे शहर असल्याने येथील अनेकांची फुफ्फुसाची क्षमता तुलनेने कमी आहे. तसेच क्षय रुग्णांची संख्या अधिक आहे. या कारणास्तव मालेगावात करोनाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता अधिक असल्याचा इशारा जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिला. अशा परिस्थितीत नागरिकांनी सामाजिक अंतरासह सर्व नियमांचे पालन करणे अत्यावश्यक आहे. नियमभंग करू नये. करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पुढील 15 दिवस अतिशय महत्वाचे आहेत. प्राप्त परिस्थितीत सुखरूपपणे बाहेर पडण्यासाठी सर्व नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी मांढरे यांनी केले आहे.

इमर्जन्सी ऑपरेशन सेंटरची निर्मिती  
मालेगावमधील कोरोनाचा प्रसार तातडीने रोखण गरजेचं असल्याने मालेगावसाठी स्थानिक इमर्जन्सी ऑपरेशन सेंटरची निर्मिती केली आहे. मालेगावची विशिष्ट भौगोलिक परिस्थिती आणि दाटीवाटीचा परिसर लक्षात घेता जिल्हाधिकाऱ्यांनी हा निर्णय घेतला आहे. कळवणचे सहाय्यक जिल्हाधिकारी पंकज आशिया यांची या सेंटरच्या व्यवस्थापक व प्रमुख समन्वयक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. इमर्जन्सी सेंटरची सर्व जबाबदारी आशिया यांच्याकडे देण्यात आली आहे. तसेच चालढकल करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचेही अधिकार देखील त्यांना देण्यात आले आहेत.