Nagpur District Gram Panchayat Election Result Live Update : नागपूर जिल्ह्यातील 236 ग्रामपंचायतींसाठी (Gram Panchayat Elections) आज सकाळी दहापासून मतमोजणीला सुरुवात झाली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांच्या कामठी-मौदा क्षेत्रात आतापर्यंतच्या प्राप्त निकालानुसार, भाजपनं (BJP) बाजी मारली असून राज्यातही सर्वाधिक जागा भाजप-शिंदे गट जिंकणार असल्याचा दावा बावनकुळे यांनी केला आहे. यानिमित्त नागपुरात सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनानिमित्त विधानभवन परिसरात बावनकुळेंनी लाडू वाटले. जनतेतून थेट सरपंच निवडीच्या निर्णयाचे हे प्रतिबिंब आहे, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे.
महाराष्ट्रात ग्रामपंचायत निवडणूक विजयाचा जल्लोष सुरू झाला आहे. 3500 च्यावर ग्रामपंचायतींमध्ये भारतीय जनता पक्षाचे समर्थीत उमेदवार निवडून आले आहे. 1000च्या पेक्षा जास्त ठिकाणी एकनाथ शिंदे यांचे उमेदवार निवडून आले आहेत. आतापर्यंत हाती आलेल्या निकालांपैकी निम्म्यापेक्षा जास्त ग्रामपंचायतींवर भाजप आणि शिंदे गटाने विजय मिळविला आहे. यानंतर भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी विधानभवन परिसरात मोठा जल्लोष केला. त्यानंतर आमदार बावनकुळेंनी परिसरात लाडू वाटून आनंद साजरा केला. यावेळी माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, ग्रामपंचायतीच्या निकालामध्ये शिंदे आणि फडणवीस सरकारच्या कामाची छाप दिसून आली आहे. पहिल्या टप्प्यात आलेल्या सुमारे 1000 ग्रामपंचायतीच्या निकालापैकी 513 ग्रामपंचायती भाजपच्या ताब्यात आल्या असल्याचा दावा बावनकुळे यांनी केला आहे.
कॉंग्रेसची अवस्था अपक्षांपेक्षा वाईट: बावनकुळे
बावनकुळे म्हणाले, राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत काँग्रेसची (Congress) अवस्था अपक्षांपेक्षा वाईट झाली आहे. 140 ग्रामपंचायती शिंदेच्या शिवसेनेने राखल्या आहेत. संपुर्ण निकाल येतील तेव्हा 3 हजार ग्रामपंचायती भाजपाच्या असतील तर 1 हजार ग्रामपंचायती शिंदेच्या शिवसेनेच्या (बाळासाहेबांची शिवसेना) असतील, असा दावा बावनकुळे यांनी केला आहे. महाविकास आघाडीचे सरकार असताना मागील अडीच वर्षे त्यांनी नागपुरात अधिवेशन घेतले नाही. नागपूर कराराचा भंग केला. आज तेच लोक हिवाळी अधिवेशन तीन आठवड्यांचे घ्या, अशी मागणी करत आहेत. वास्तविक पाहता त्यांना बोलण्याचा काहीच अधिकार नाही, अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.
...म्हणून उद्धव ठाकरे यांच्या पक्षाची अधोगती
उद्धव ठाकरे यांच्या निर्णयामुळे बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेल्या शिवसेनेची अधोगती झाली आहे. उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्वाचा अजेंडा बाजूला ठेवला आहे. त्यांचे मागील अडीच वर्षांतील वागणे काँग्रेसधार्जिणे आहे. भविष्यात ते ओवेसींसोबतही युती करतील, असा घणाघात आमदार बावनकुळेंनी केला. दुपारी चार ते साडेचार वाजेपर्यंत सर्वच निकाल हाती येण्याची शक्यता आहे. तेव्हा एकंदरीत चित्र स्पष्ट होणार आहे. निकाल लागलेल्या ग्रामपंचायतींमध्ये जल्लोष सुरू झालेला आहे. तसेच नागपूर जिल्ह्यातील पराभूत झाल्याती माहिती असलेल्या अनेक उमेदवारांचे मोबाईल स्विच ऑफ दिसत आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :