Gram Panchayat election Result 2022: औरंगाबाद जिल्ह्यातील 208 ग्रामपंचायतसाठी झालेल्या निवडणुकीचा निकाल हाती येत आहे. दरम्यान औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील एका ग्रामपंचायत निकालाची जिल्हाभरात चर्चा पाहायला मिळत आहे. कारण दोन दिवसांपूर्वी ग्रामपंचायत निवडणूकीत पैसे वाटप करतानाचा ज्या व्यक्तीचा कथित व्हिडिओ व्हायरल झाला होता त्यांच्या पत्नी सरपंच पदी निवडून आल्या आहेत.
वैजापूर तालुक्यातील तिडी या गावातील माजी सरपंच सुदाम आहेर यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. ज्यात ते पैसे वाटप करतांना पाहायला मिळत होते. तर आहेर यांच्याकडून मतदारांना पैसे वाटप केले जात असल्याचा आरोप विरोधकांनी केला होता.दरम्यान आज येत असलेल्या निवडणुकीच्या निकालानंतर सुदाम आहेर यांच्या पत्नी रंजना सुदाम आहेर यांचा सरपंच पदी विजय झाला आहे. त्यामुळे या विजयाची परिसरात जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे.
पाहा व्हिडिओ...
तहसीलदारांनी दिले चौकशीचे आदेश...
वैजापूरच्या तिडी गावातील पैसे वाटप करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने, याची दखल प्रशासनाने घेतली आहे. पैसा वाटप करणारा नेमका कोण आहे?,हा व्हिडिओ खरा आहे का? तसेच हा व्हिडिओ कधीचा आणि नेमका कुठला आहे याचा तपास करण्याचे आदेश वैजापूरचे तहसीलदार राहुल गायकवाड यांनी दिले आहे. तसेच या चौकशीतून नेमकं समोर काय येते, त्यानंतरच पुढील कारवाईची दिशा ठरवता येईल असेही तहसीलदार गायकवाड म्हणाले.
काय आहे संपूर्ण प्रकरण...
ग्रामपंचायत निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी सोशल मीडियावर पैसे वाटप करतानाचा एक कथित व्हिडिओ व्हायरल झाला होता. या कथित व्हिडिओमध्ये एका घराच्या बाहेर काही कार्यकर्ते उभे असल्याचं दिसत होते. सोबतच घराच्या आतमध्ये खुर्चीवर बसलेल्या एका व्यक्तीच्या हातात नोटा पाहायला मिळत असून, तो समोर बसलेल्या व्यक्तीला हे पैसे देतांना व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे. व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच, हे पैसे ग्रामपंचायत निवडणुकीत वाटले गेल्याचा दावा विरोधकांनी केला आहे. तर याप्रकरणी विरोधकांनी तहसीलदार यांच्याकडे धाव घेत तक्रारही केली आहे. त्यामुळे आता प्रशासनाच्या चौकशीत नेमकं काय समोर येणार हे पाहणं महत्वाचे ठरेल.
शिंदे गटाला औरंगाबादमध्ये दुसरा मोठा धक्का, बिडकीननंतर वैजापूरच्या महालगावातही पराभव