मुंबई : राज्य सरकारमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वगळता मंत्रिमंडळातील सर्वच मंत्री बैठकीला शतप्रतिशत उपस्थित असतात. कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर हे दांडीबहाद्दर मंत्र्यांमध्ये अव्वल आहेत. तर टॉप 5 मंत्र्यांमध्ये सुधीर मुनगंटीवार, चंद्रशेखर बावनकुळे, पंकजा मुंडे, संभाजी निलंगेकर-पाटील, राजकुमार बडोले यांचाही समावेश आहे.
माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मुख्य सचिव कार्यालयाकडे मंत्रिमंडळाच्या बैठकी आणि मंत्र्याची उपस्थितीची माहिती मागितली होती. मुख्य सचिव कार्यालयाने दिलेल्या माहितीतून ही माहिती समोर आली आहे.
17 जुलै 2016 पासून 22 मे 2017 या कालावधीत एकूण 35 मंत्रिमंडळाच्या बैठकी झाल्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा अपवाद वगळता 22 च्या 22 मंत्र्यानी दांडी मारली. या दांडी बहाद्दरांमध्ये कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी अव्वल क्रमांक पटकावत 35 पैकी 11 वेळा अनुपस्थित होते.
अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे या दोघांनीही 9 वेळा अनुपस्थित राहत दुसरा क्रमांक पटकवला. यानंतर ग्रामविकास आणि महिला बाल विकास मंत्री पंकजा मुंडे, सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले आणि कामगार मंत्री संभाजी निलंगेकर-पाटील हे तिघे प्रत्येकी 8 वेळा अनुपस्थित होते.
अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक सरंक्षण मंत्री गिरीष बापट आणि गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता हे दोघे 7 वेळा अनुपस्थित होते. जलसंधारण आणि राजशिष्टाचार मंत्री राम शिंदे आणि पर्यावरण मंत्री रामदास कदम हे 6 वेळा अनुपस्थित होते.
सहकार मंत्री सुभाष देशमुख, सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे आणि पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर हे तिघे 5 वेळा अनुपस्थित होते.
महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, उद्योग मंत्री सुभाष देसाई, सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ. दीपक सावंत हे प्रत्येकी 4 वेळा तर पर्यटन मंत्री जयकुमार रावल 3 वेळा आणि वैद्यकीय शिक्षण, जलसंपदा आणि लाभक्षेत्र विकास मंत्री गिरीष महाजन 2 वेळा अनुपस्थित होते.
प्रत्येकी 1-1 वेळा शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे, परिवहन मंत्री दिवाकर रावते, आदिवासी मंत्री विष्णू सावरा आणि पशुसंवर्धन, दुग्धविकास आणि मत्स्यविकास मंत्री महादेव जानकर अनुपस्थित होते.
मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्याचा विकास आणि धोरणांबाबत महत्वाची चर्चा होत असते. मात्र कृषी विभाग, अर्थ विभाग आणि ग्रामविकास मंत्रालयासारख्या महत्वाच्या विभागाचेच मंत्री बैठकीला नेहमी का अनुपस्थित असतात, असा सवाल केला जात आहे.
कृषीमंत्री फुंडकरांची 35 पैकी 11 मंत्रिमंडळ बैठकीला दांडी
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
29 Jul 2017 04:42 PM (IST)
राज्य सरकारमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वगळता मंत्रिमंडळातील सर्वच मंत्री बैठकीला शतप्रतिशत उपस्थित असतात. कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर हे दांडीबहाद्दर मंत्र्यांमध्ये अव्वल आहेत.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -