मुंबई : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना घटस्थापनेदिवशीच शासनानं खुशखबर दिली आहे. राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ४ टक्के वाढ करण्याचा निर्णय शासनानं घेतला आहे. त्यामुळे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्याचा दर 132 वरून 136 इतका झाला आहे.
राज्य सरकारकडून आज गुरुवारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 4 टक्क्यांची वाढ करण्यात आल्याची घोषणा करण्यात आली. वाढीव महागाई भत्त्यासह पगारवाढ 1 जानेवारी 2017 पासून लागू होईल. यातील ऑगस्टपासूनचा महागाई भत्ता कर्मचाऱ्यांना रोख स्वरुपात तर जानेवारी 2017 ते जुलै 2017 या 7 महिन्यांचा भत्ता कशाप्रकारे द्यायचा याबाबत वेगळा अध्यादेश सरकार काढणार आहे.
यापूर्वी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात एप्रिलमध्ये 7 टक्क्यांची वाढ करण्यात आली होती. एप्रिलमध्ये राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 132 टक्क्यांपर्यंत वाढवण्यात आला होता. यात आता अजून 4 टक्क्यांची भर पडली आहे.
राज्य सरकारच्या या निर्णयाचा फायदा राज्य सरकारच्या 16 लाख कर्मचारी आणि 6 लाख निवृत्तीवेतनधारकांना होणार आहे. नुकतीच केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात एक टक्क्यानं वाढ करण्यात आली होती. 50 लाख केंद्र सरकारी कर्मचारी आणि 61 लाख निवृत्त वेतनधारकांना याचा फायदा मिळणार आहे.