मुंबई : गेल्या काही दिवसांत शासकीय अनेक परिक्षांमध्ये पेपरफुटीची प्रकरणं समोर आली आहेत. आधी लातूरमध्ये आरोग्य विभागाच्या पेपरफुटीनंतर म्हाडा परिक्षांची पेपरफुटीही समोर आली. ज्यामुळे आता असा गोंधळ टाळण्यासाठी राज्य सरकारने या परीक्षा घेण्याकरता काही कंपन्यांची निवड केली आहे. त्यामुळे यापुढे राज्यातील शासकीय विभागांमार्फत होणाऱ्या परीक्षा यापुढील काळात एमकेसीएल ( महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लिमिटेड), आयबीपीएस ( इन्स्टिट्युट ऑफ बँकिंग पर्सोनेल) किंवा टीसीएस ( टाटा कन्सलटन्सी सर्व्हिसेस) या संस्थांच्या माध्यमातूनच घेण्यात येणार आहेत. राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला.


या महत्त्वाच्या निर्णयाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील अनुमती दर्शविली आहे. याआधी 2014 मध्ये सुद्धा या संस्थांच्या माध्यमातून परीक्षा घेण्यात येत होत्या. मात्र सरकार बदलल्यांतर हे कंत्राटही बदलण्यात आलं होतं. पण आता महाविकास आघाडीने आपला निर्णय बदलला आहे. दरम्यान याआधी म्हाडाच्या परीक्षा आता टीसीएसच्या मदतीनं घेण्यात येणार असल्याचं समोर आलं होतं. म्हाडाचा पेपर फुटल्यानंतर परीक्षेबाबत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला होता. पेपरफुटीमुळे रद्द झालेली परिक्षाही लवकरात लवकर घेण्यात येईल आणि त्यात पूर्ण पारदर्शकता राखली जाईल, असंही मंत्री जितेंद्र आव्हाड म्हणाले होते. 


पेपरफुटीमागे मराठवाडा कनेक्शन


आरोग्य विभागापाठोपाठ म्हाडाच्या परीक्षेचं पेपरफुटीचं रॅकेट समोर आलं होतं. यातलं मराठवाडा कनेक्शन पुन्हा एकदा समोर आलं आहे. आरोग्य विभागाच्या झालेल्या परीक्षेतही जालना मधील दोन आणि औरंगाबाद येथील एका व्यक्तीला पुणे सायबर पोलिसांनी अटक केली होती. आताच्या प्रकरणात औरंगाबादमध्ये सरकारी परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये परिचित असलेले गणिताचे प्राध्यापक अजय चव्हाण आणि सक्षम अ‍ॅकॅडमीचा संचालक कृष्णा जाधव, अंकित चनखोरे हे त्यांच्या अकॅडमीमधील विद्यार्थ्यांसाठी रॅकेटच्या प्रमुख सुत्रधाराकडून पेपर विकत घेणार होते. औरंगाबादच्या शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे. शहरात मागील काही वर्षांमध्ये स्पर्धा परीक्षेच्या क्लासेसची वाढती संख्या आणि क्रमाने स्पर्धेत यशस्वी विद्यार्थ्यांचा आकडा वाढवण्यासाठी आता क्लासेस चालक आधीच पेपर विकत घेण्याच्या घोटाळ्यात सहभागी होत असल्याचं समोर आलं आहे. या परीक्षेच्या आयोजनाचे कंत्राट जी.ए.सॉफ्टवेअर कंपनीला देण्यात आली होती. या कंपनीचा संचालक डॉ. प्रितीश देशमुख यांनीच पेपर फोडल्याची माहिती पोलिसांना मिळाली आणि त्यांनी रॅकेट उघडकीस आणले. देशमुख ला अटक केल्यानंतर मात्र आरोग्य विभागाच्या घोटाळ्याप्रमाणेच शहरातील दोन क्लासेसचे तीन प्राध्यापकांनीच सर्वाधिक पेपरची मागणी केल्याचे समोर आलं होतं. 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 



मराठी लाईव्ह न्यूज सुपरफास्ट पाहा ABP Majha वर, मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, मनोरंजन, क्रिकेट, देश-विदेशातील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर Live