Beed News Update : ग्रामपंचायत निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांना आता ऑफलाइन खर्च भरता येणार आहे. राज्य निवडणूक आयोगाने (State Election Commission) तसे आदेश दिले आहेत. राज्य निवडणूक आयोगाच्या या निर्णयामुळे ग्रामपंयत उमेदवारांचा  ( Gram Panchayat Election ) निवडणूक खर्च भरण्याचा मार्ग मोकळा झालाय. ग्रामपंचायत निवडणुकीतील प्रत्येक उमेदवाराला त्याने निवडणुकीत केलेल्या खर्चाचे तपशील ऑनलाइन पद्धतीने भरणे बंधनकारक आहे. शिवाय निवडणूक झाल्यापासून एका महिन्याच्या आत हा खर्चाचा तपशील ऑनलाईन भरावयाचा आहे. 18 डिसेंबर 2022 रोजी राज्यभरातील जवळपास 7 हजारपेक्षा जास्त ग्रामपंचायतींच्या निवडणुका झाल्या. त्यानंतर एका महिन्याच्या आत या निवडणुकीच्या खर्चाचा तपशील ऑनलाईन भरणे बंधनकारत होते. परंतु, हा खर्च भरण्याची वेबसाईट व्यवस्थित चालत नसल्याने उमेदवारांपुढे मोठा प्रश्न उभा होता. मात्र, राज्य निडणूक आयोगाच्या या निर्णयामुळे आता उमेदवारांची चिंता मिटलीय. 


18 डिसेंबर 2022 रोजी ग्रामपंचायतींच्या निवडणुका झाल्या होत्या. त्यानंतर 20 डिसेंबर 2022 रोजी मतमोजणी झाली होती. त्यामुळे 18 जानेवारी 2023 च्या आधी उमेदवारांना निवडणुकीच्या खर्चाचा ऑनलाईन खर्च भरणे बंधनकारक होते. परंतु, ऑनलाईन करण्यासाठी वेबसाईट चालत नव्हती. त्यामुळे राज्यभरातून ग्रामपंचायत उमेदवारांमध्ये संताप पाहायला मिळत होता. अखेर ग्रामपंचायत निवडणूक लढणाऱ्या उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने खर्चाचा तपशील भरण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने दिले आहेत. राज्य निवडणूक आयोगाने सर्वच जिल्हा प्रशासनाला ऑनलाइन ऐवजी ऑफलाइन खर्च भरून घेण्याचे आदेश दिले आहेत. 
 
ऑनलाईन वेबसाईट चालत नसल्याने ग्रामपंचायत उमेदवारांना अनेक अडचणी येत होत्या. त्यामुळे अनेक उमेदवार हे इंटरनेट कॅफेवर रात्रभर जागून हा खर्च भरण्यासाठी प्रयत्न करत होते. तरी देखील ऑनलाइन खर्च भरण्यासाठी असंख्य अडचणी येत असल्याने आता निवडणूक आयोगाने सर्वच जिल्हा प्रशासनाला या उमेदवारांचा खर्च हा ऑनलाइन भरून घेण्याचे आदेश दिले आहेत. 


खर्चाचा तपशील भरला नाही तर पुढची निवडणूक लढवता येत नाही


ग्रामपंचायत असो किंवा इतर कोणतीही निवडणूक असो निवडणुकीनंतर उमेदवाराला निवडणुकीच्या खर्चाचा तपशील भरावाच लोगतो. हा तपशील भरला नाही तर उमेदाराला पुढची निवडणूक लढता येत नाही. बीड जिल्ह्यातील एका उमेदवाराला याचा फटका बसला आहे. त्यांनी खर्चाचा तपशील भरून देखील तो रेकॉर्डवर न आल्यानेत त्यांना निवडणूक लढवता आली नाही. 


बीड जिल्ह्यातील करसुंडी गावातील हनुमान मुळे यांनी मागच्या वेळी (2017) ग्रामपंचायत निवडणूक लढवली आणि निवडणुकीत झालेल्या खर्चाचा तपशील तहसीलला कळवला. मात्र हा खर्च तहसीलच्या रेकॉर्डला आलाच नाही. एक महिना उलटून गेल्यानंतर हनुमान मुळे यांना पाच वर्ष निवडणूक लढण्यास बंदीची कारवाई करण्यात आली. एकट्या बीड जिल्ह्यात मागच्या वर्षी 1000 पेक्षा जास्त उमेदवारांवर ही कारवाई करण्यात आली. परंतु, आता अशीच भीती राज्यभरातील निवडणूक लढणाऱ्या उमेदवारांमध्ये निर्माण होती. कारण मतदान झाल्यापासून एक महिन्याच्या आत निवडणूक लढलेल्या प्रत्येक उमेदवाराने त्याचा निवडणुकीच्या खर्चाचा तपशील ऑनलाईन पद्धतीने शासनाकडे सादर केला नाही तर त्यांच्यावर या पुढची निवडणूक लढण्यास बंदीची कारवाई होऊ शकते. हा तपशील ऑनलाई पद्धतीने भरायचा आहे. परंतु, हा तपशील भरत असताना अनेक अडचणी येत आहेत. त्यामुळे उमेदवारांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. मात्र, निवडणूक आयोगाने हा खर्च ऑफलाईन भरण्याचे आदेश दिल्यामुळे उमेदवारांपुढील मोठी चिंता मिटली आहे.