नागपूर : केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारानंतर आता राज्य मंत्रिमंडळालाही विस्ताराचा मुहूर्त सापडला आहे. येत्या 7 दिवसात राज्य मंत्रिमंडळ विस्तार आणि मंत्रिमंडळातील बदलाची शक्यता आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.


राज्य मंत्रिमंडळात किती नवे चेहरे समाविष्ट केले जातील, याबाबत मात्र शंका आहे. कारण राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार कमी आणि मंत्रिमंडळात फेरबदल जास्त असेल, अशी माहितीही सूत्रांनी दिली आहे.

2019 साठी पंतप्रधान मोदींनी केंद्रात आपली नवी टीम तयार केली. यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळात मोठे फेरबदल करण्यात आले. त्यानंतर आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही राज्य मंत्रिमंडळात बदल करण्याची शक्यता आहे.

मेहता, देसाईंचं काय होणार?

गेल्या काही दिवसांमध्ये गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहतांच्या एसआरए घोटाळ्यामुळे आणि एमआयडीसीतील घोटाळ्यामुळे उद्योगमंत्री सुभाष देसाई वादात आहेत. दोन्ही मंत्र्यांच्या चौकशीसाठी समितीही नियुक्त केली आहे. मात्र स्वच्छ आणि पारदर्शी कारभाराचा हवाला या चेहऱ्यांसकट कसा देणार ? हा प्रश्न आहे. त्यामुळे मंत्रिमंडळातील चेहऱ्यांमध्ये बदल करण्याच्या हालचाली सुरु आहेत.

शिवसेनेला संधी देणार का?

केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेनेला संधी देण्यात आली नाही. त्यामुळे राज्य मंत्रिमंडळात शिवसेनेला संधी मिळते का आणि किती प्रमाणात संधी मिळते, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कारण केंद्रीय मंत्रिमंडळानंतर शिवसेनेने जाहीर नाराजी व्यक्त केली होती. शिवाय, 'सामना'तूनही जोरदार टीका केली होती. त्यामुळे राज्य मंत्रिमंडळात शिवसेनेचा किती विचार केला जातो, हे पाहणं आता महत्त्वाचं ठरेल.