मुंबई : मराठा वादळ मुंबईपर्यंत जाऊन पोहोचलं आहे. सीएसएमटीसमोर मुख्य रस्त्यावर दुतर्फा वाहतूक कोंडी झाली आहे. त्यामुळे सीएसएमटी परिसरात प्रचंड गर्दी झाली आहे. मराठा आंदोलकांनी सीएसटीच्या बाहेर आंदोलन सुरु केलं आहे. शेकडोंच्या संख्येनं आंदोलक मुख्य रस्त्यावर बसले आहेत. आजचा दिवस (26 जानेवारी) मराठा आरक्षणासाठी निर्णायक राहणार आहे. सरकारी पातळीवर मनोज जरांगे पाटील यांच्याकडे शिष्टमंडळ पाठवून तोडगा निघतो का? पाहिलं जात आहे. मात्र, जरांगे मागण्यांवर ठाम असल्याने सरकार आता यावर कसा तोडगा काढणार? आणि मुंबईमधील परिस्थिती कशी हाताळणार? यावर आता बरच काही अवलंबून असणार आहे. 


सीएसएमटी नाही, तर आम्ही संपूर्ण मुंबईचा ताबा घेणार 


दरम्यान, सीएसटी परिसरात गर्दी झाल्यानंतर मुंबई पोलिस सक्रिय झाले आहेत. वरिष्ठ पोलीस अधिकारी आंदोलकांना विनंती करून बाजूला करण्याचा प्रयत्न करत आहेत. मराठा मोर्चाचे समन्वयक वीरेंद्र पवार यांनी गर्भित इशारा दिला आहे. केवळ सीएसएमटी नाही, तर आम्ही संपूर्ण मुंबईचा ताबा घेणार आहोत, आंदोलकांना आवाहन करतोय की सर्वांनी आझाद मैदानात यावं असं त्यांनी म्हटलं आहे. 



एकटा निर्णय घेऊ शकत नाही


दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराज चौकात पुढची चर्चा आपण करूया. राज्य सरकारच्या शिष्टमंडळांना जीआरसाठी जी काय कागदपत्रे समोर ठेवली आहेत त्यात काय दुरुस्ती आहे, त्यात नेमक्या कोणत्या मागण्या मान्य होत आहेत, ते सगळं आपण  चर्चा करून ठरवू. कोणताही निर्णय मी एकटा घेऊ शकत नाही, सगळ्यांसमोर चर्चा करून निर्णय घेईल, असे मनोज जरांगे म्हणाले आहेत. 


मराठा आरक्षणावर दादा भूसे काय म्हणाले? 


मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे याबद्दल दुमत नाही, इतर आरक्षणाला धक्का न लागता कायद्याच्या चौकटीत असणारे आरक्षण देण्याचा प्रयत्न आहे. सर्वोच्च न्यायालयात हा प्रश्न प्रलंबित आहे. शिंदे समितीच्या माध्यमातून दिवसरात्र काम सुरू आहे. सर्वच जण प्रयत्न करत आहे, काय काय केलं हे सर्व त्यांच्या समोर ठेवण्याचा प्रयत्न केला आहे, अशी प्रतिक्रिया कृषीमंत्री दादा भुसे यांनी दिली आहे.  मुख्यमंत्र्यांनी शिवाजी महाराजांची शपथ घेतली आहे. मागासवर्गीय समितीच्या माध्यमातून डेटा कलेक्ट करत आहेत. दीड लाख कर्मचारी काम करत आहेत, मुख्यमंत्री चर्चेसाठी अंतरवलीला सुद्धा गेले होते, असेही दादा भुसे म्हणाले. 


इतर महत्वाच्या बातम्या