लोणावळा (पुणे) : गेल्या तब्बल चार दशकांपासून राज्यामध्ये मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) मुद्दा सातत्याने चर्चेत येत राहिला आहे. मात्र खऱ्या अर्थाने या मराठा आरक्षणाच्या मुद्द्याला 2009 पासून हात घातला गेला आणि चर्चेला सुरुवात झाली. मात्र आजतागायत या प्रश्नावर अजूनही समाधानकारक तोडगा निघालेला नाही. मराठा आरक्षणाचा कधी मुद्दा उपस्थित झाला, तर कधी विस्मरणात गेला, तर कधी कायद्याच्या कचाट्यात अडकला गेला. असाच मराठा आरक्षणाचा आजवर प्रवास झाला आहे. मात्र सप्टेंबर महिन्यात जालना जिल्ह्यातील (Jalna Police) आंतरवाली सराटीत पोलिसांच्या अमानुष लाठीमाराने मराठा आरक्षणाचा मुद्दा आता घरोघरी गेला. इतकेच नव्हे तर सरकारला या मराठा आरक्षण मुद्द्यावर पूर्णतः बॅकफूट जावं लागला आहे. याच आंतरवाली सराटी आणि जालना परिसरात गेल्या दीड दशकांपासून आंदोलन करत असलेले मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) हे सामान्य नाव देशपातळीवर पोहोचलं आहे. एका सामान्य असामान्य प्रवास काय असतो, हेच या प्रवासातून सिद्ध झालं आहे.  



पोलिसांच्या लाठीमाराने ठिणगी पडली 


आंतरवाली सराटीत जालना पोलिसांकडून अमानुष्य लाठीमार झाला आणि आंतरवाली सराटीतील मराठा आरक्षणाचा मुद्दा राज्यभर गेला. त्याठिकाणी आंदोलकांसोबत असलेल्या मनोज जरांगे पाटील यांनी तेव्हापासून राज्य सरकारच्या नाकात दम करून ठेवला आहे. आंतरवाली सराटीमध्ये झालेल्या पोलिसांच्या मारहाणीत अनेक मराठा कार्यकर्ते, महिला जखमी झाल्या. अनेकांची डोकी फुटली गेली, तर या घटनेत 79 पोलिस सुद्धा गंभीर जखमी झाले. त्यानंतर खऱ्या अर्थाने मराठा आरक्षणासाठी लढा सुरू झाला आहे. 


लोणावळ्यातील व्हायरल फोटोची चर्चा रंगली 


मनोज जरांगे यांनी आंतरवाली सराटीपासून सुरू केलेला प्रवास आता राजधानी मुंबईत येऊन पोहोचला आहे. गेल्या चार महिन्यापासून त्यांनी वेगवेगळ्या पातळ्यांवर आंदोलन करताना संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढत मराठा आरक्षणासाठी रान उठवलं आहे. त्यामुळे आता सरकारची सुद्धा पळापळ सुरू झाली आहे. दरम्यान या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर लोणावळामधील एक फोटो सुद्धा सोशल मीडियामध्ये व्हायरल होत आहे. 


या फोटोमध्ये मराठा आंदोलक पोलिसांना आपुलकीने भाकरी देताना दिसत आहेत. त्यामुळे ज्या हातांनी आंतरवाली सराटीत घात केला, तोच हात आता लोणावळ्यात एकमेकांना भाकरी देताना दिसल्याने या व्हायरल फोटोची चर्चा रंगली आहे. 


जरांगे पाटील यांची मराठ्यांसोबत असलेली पायी दिंडी पुण्यामध्ये पोहोचल्यानंतर 'न भूतो न भविष्यती' अशा पद्धतीने यांचे स्वागत करण्यात आले. पुण्यामध्ये कडाक्याची थंडी असताना सुद्धा या स्वागतामध्ये कोणतीही कसर पुणेकरांनी ठेवली नाही. लोणावळ्यामध्ये झालेली सभा सुद्धा अभूतपूर्व होती. हजारो मराठा कार्यकर्त्यांचा ताफा राशन पाणी घेऊनच मुंबईच्या दिशेने प्रवास करत आहेत. जिथे मुक्काम पडेल त्या ठिकाणी जेवणाची सोय केली जात आहे. 


आता हे मराठा वादळ मुंबईपर्यंत जाऊन पोहोचलं आहे. दरम्यान आजचा दिवस (26 जानेवारी) मराठा आरक्षणासाठी निर्णायक राहणार आहे. सरकारी पातळीवर मनोज जरांगे पाटील यांच्याकडे शिष्टमंडळ पाठवून तोडगा निघतो का? पाहिलं जात आहे. मात्र, जरांगे मागण्यांवर ठाम असल्याने सरकार आता यावर कसा तोडगा काढणार? आणि मुंबईमधील परिस्थिती कशी हाताळणार? यावर आता बरच काही अवलंबून असणार आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या