तुळजापूर : तुळजापूर मंदिर संस्थानच्या भोंगळ कारभाराचा फटका भक्तांना बसला आहे. चैत्रपोर्णिमेच्या पूर्वसंध्येला तुळजापुरात तीर्थकुंडात स्नानासाठी मोठी गर्दी झाली होती. मात्र इथं कोणतीही व्यवस्था आणि नियोजन नसल्यामुळे चेंगराचेंगरीसदृश परिस्थिती निर्माण झाली होती.

श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या नियोजनशून्य कारभाराचा फटका शुक्रवारी पहाटे देवीदर्शनास येणाऱ्या भाविकांना मोठ्या प्रमाणात बसला. महसूल, पोलीस विभाग निवडणूक प्रक्रियेत गुंतल्याने सुरक्षा व्यवस्था कमी असल्याचे चित्र पाहायला मिळाले.

चैत्रपोर्णिमेनिमित्ताने लाखो भाविक तुळजापुरात येतात. याबाबत माहिती असूनही मंदिर प्रशासनाकडून तीर्थकुंडात स्नानाच्या सोयी बाबतीत कुठलेही पाऊल न उचलल्याने  मंदिरात असणाऱ्या श्री कल्लोळ तीर्थकुंडात गुरुवार रात्री दहा वाजेपासून भाविकांची भलीमोठी गर्दी झाली होती. यावेळी कल्लोळ तीर्थकुंड अपुरे पडल्याने ही रांग टोळभैरव मंदिराकडील लहान गल्लीत गेल्याने गदारोळ उडाला.

काही वेळ चेंगराचेंगरी होवून भाविकांचे श्वास कोंडले गेले.  या चेंगराचेंगरीत सापडलेल्या अनेक भाविकांनी तर दैव बलवत्तर म्हणून वाचल्याचे सांगितले.  या घटनेवेळी पोलिस  बंदोबस्त नसल्याची माहिती काही भाविकांनी दिली.

गोंधळ वाढल्यानंतर पोलिसांनी हस्तक्षेप करत तीर्थस्नान बंद केले. यामुळे अनेक भाविक स्नान न करताच बाहेरुनच देवीदर्शन घेवून रवाना झाले.