जालना : "रावसाहेब दानवे हे माझी महेबूबा आहे. मी त्यांच्यावर प्रेम करतो, तर ते माझ्यावर इश्क करतात," अशा शब्दात शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांनी आपल्या मैत्रीमधलं प्रेम व्यक्त केलं. विशेष म्हणजे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्यासमोर खोतकर बोलत होते. त्यांच्या या वक्तव्यानतर एकच हशा पिकला.


जालन्यात आज भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या प्रचारासाठी सभा घेण्यात आली होती. यावेळी भाषणादरम्यान प्रस्तावना देताना अर्जुन खोतकर यांनी दोघांच्या मैत्रीमधलं प्रेम व्यक्त केलं. खोतकर म्हणाले की, "यावेळी आपल्याला नवी इतिहास निर्माण करायचा आहे आणि रावसाहेब दानवेंना प्रचंड मतांनी विजयी करायचं आहे. रावसाहेब दानवे आणि मी दोघेही 30 वर्षांचे जोडीदार आहोत. खरंतर रावसाहेब दानवे हे माझी मेहबूबा आहेत. मी त्यांच्यावर प्रेम करतो, ते माझ्यावर इश्क करतात. ही जोडगोळी तीस वर्ष विधानसभेपासून लोकसभेपर्यंत काम करते."

मी आणि अर्जुन खोतकर कधीही भांडलो नाही : रावसाहेब दानवे

खरंतर शिवसेना-भाजप युती होण्यापूर्वी रावसाहेब दानवे आणि अर्जुन खोतकर यांच्यातील विस्तव जात नव्हता. अर्जुन खोतकर यांनी बंड करत जालनाच्या जागेवर दावा केला होता. दानवेंना जालन्यात अस्मान दाखवू असा निश्चय खोतकरांनी केला होता. पंरतु युतीनंतर ही जागा भाजपला मिळाली. तरीही खोतककांनी दानवेंविरोधात लढण्याचा इरादा बोलून दाखवला होता. मात्र युतीनंतर त्यांची दिलजमाई झाली.