पुणे- आज सकाळपासून राज्याच्या नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागाचा सर्व्हर डाऊन झाल्याने जमीन खरेदी-विक्रीचे व्यवहार ठप्प झाले आहेत. नोंदणीसाठी आलेल्या नागरिकांची यामुळे मोठी गैरसोय होत आहे.

नववर्षाच्या पार्श्वभूमीवर नागरिक खरेदी विक्रीला प्राधान्य देतात. त्यामुळे पुण्यातील २७ नोंदणी कार्यालयांमध्ये सकाळपासूनच गर्दी झालेली होती. दस्त नोंदणीची कार्यालयं सकाळी सात वाजता सुरू होतात. त्यामुळे लोक सात वाजल्यापासूनच या कार्यालयांमधे रांगा लावतात. मात्र आज सकाळपासूनच सर्व्हर डाऊन असल्यानं लोक हतबल झाले. बाहेर गावाहून आलेले लोक खोळंबले असून अशाप्रकारे वारंवार सर्व्हर डाउन होत असल्याने लोकांचा वेळ आणि पैसा दोन्हीही वाया जातो आहे.

राज्याच्या नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागाचे कार्यालय पुण्यात आहे. महसुल विभागाने ज्या कंपनीला ऑनलाइन दस्त नोंदणीचे काम दिले आहे त्या कंपनीचा सर्व्हर गेल्या काही महिन्यांपासून वारंवार बंद पडतो आहे. गेल्या वर्षभरात सर्व्हर डाऊन किंवा स्लो होण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. त्यामुळे अधिकारीही वैतागले आहेत.