मुंबई : सलग तिसऱ्या दिवशी संप कायम ठेवणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांवर आता प्रशासनानं कारवाईचा बडगा उचलला आहे. मुख्यमंत्र्यांच्या आवाहनानंतरही एसटी कर्मचारी संपावर ठाम असल्यानं एसटी महामंडळाकडून विभागीय नियंत्रकांना कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाईचे थेट आदेश दिले आहे.  संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना निलंबनाऐवजी थेट बडतर्फच्या कारवायाचे संकेत दिले आहे. 


काही राजकीय पक्षाच्या नेत्यांनी आंदोलन चिघळवण्याचा प्रयत्न केल्याने मंत्र्यांमध्ये नाराजी आहे. राज्य सरकारकडून निलंबनाच्या कारवाया ज्या केल्या आहेत त्यावर ठाम आहे. राज्य सरकार निलंबनाच्या कारवायासंदर्भात माघार घेणार नाही अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. ज्या एसटी कर्मचाऱ्यांवर कारवाई झाली आहे, यात जर तो दोषी आढळला हे सिद्ध झालं तर केलेली कारवाया मागे घेणार नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. संप मागे घेण्याचं परिवहनमंत्री अनिल परब यांनी  आवाहन केले आहे. आधी संप मागे घ्या, बाकीच्या चर्चा नंतर करु असं परब यांनी म्हटलं आहे.



एसटीच्या विभागातल्या कोर्टाच्या अधिकारक्षेत्रात असणाऱ्या कामगार न्यायालयात दाद मागण्याचे निर्देश दिले आहे.  एसटी महामंडळाकडून जिल्ह्यातल्या कामगार न्यायालयात उद्या रिट याचिका दाखल करण्याचे निर्देश दिले आहे.  एसटी कर्मचाऱ्यांना निलंबनाच्या कारवाईसोबतच आर्थिक भुर्दंडही सोसावा लागू शकतो. आंदोलनाच्या दिवसापासून आतापर्यंत एसटी महामंडळाचे 100 कोटींचे नुकसान झाले आहे.



एसटी कर्मचाऱ्यांचा संप तिसऱ्या दिवशीही सुरुच आहे. एसटी महामंडळाकडून आज 542 जणांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. तर आत्तापर्यंत एकूण 918  जणांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.   लातूर, नांदेड, चंद्रपूर, गडचिरोली, नंदुरबार जिल्ह्यात निलंबनाची कारवाई करण्यात आली.. दरम्यान एसटी कामगार एकत्र येत आज मुंबई सेंट्रल ते मंत्रालय मोर्चा काढणार आहेत.



मात्र प्रशासनाच्या कारवाईला न जुमानता संप कायम ठेवणार असल्याचा पवित्रा एसटी कर्मचाऱ्यांनी घेतलाय. दुसरीकडे एसटी कर्मचाऱ्यांसह मुंबईत मंत्रालयावर मोर्चा काढण्यासाठी निघालेल्या आमदार सदाभाऊ खोत यांना पोलिसांनी मानखुर्द इथं अडवलं. त्यानंतर त्यांनी तिथंच ठिय्या मांडून अन्नत्याग आंदोलन सुरू करण्याची घोषणा केलीय.