मुंबई : गेल्या काही दिवसांपासून तापलेल्या एसटी संपावर (ST Strike) अद्याप तोडगा निघालेला नाही.   संप मोडीत काढण्यासाठी राज्य सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. नजीकच्या काळात संपावर तोडगा न निघाल्यास एसटी महामंडळाचं खासगीकरण होणार असल्याची माहिती समोर आली होती. मात्र एसटी संपाच्या पार्श्वभूमीवर परिवहन मंत्री अनिल परबांनी (Anil Parab)  एक मोठं  वक्तव्य केलं आहे. खासगीकरणावर कोणतीही चर्चा झालेली नाही, असे अनिल परब म्हणाले.


अनिल परब म्हणाले,  सध्या उपलब्ध पर्यायांपैकी खासगीकरण हा सुद्धा पर्याय आहे. सध्या मात्र कोणतीही चर्चा खासगीकरणावर झालेली नाही.  इतर राज्यांमधील परिवहन मंडळाचा अभ्यास करुन  निर्णय घेऊ आणि याबाबत अधिकाऱ्यांकडून अहवाल तयार करण्याचं काम सुरु आहे.


एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर तोडगा निघण्याऐवजी तिढा वाढणार की काय अशी चर्चा सुरू झालीय. कारण एसटीचं राज्य सरकारच्या सेवेत विलीनीकरण करण्याच्या मागणीसाठी कर्मचारी संपावर गेले असताना एसटीचं टप्प्याटप्यानं खासगीकरण करण्याचा विचार सरकारनं सुरु केल्याची माहिती समोर आली होती. उत्पन्नाचा स्त्रोत वाढवण्यावर सरकारचा भर असून तोट्यातल्या महामंडळाचं खासगीकरण करण्याचा विचार सुरू असल्याची माहिती समोर आली. 


त्यातच कोरोनामुळे रखडलेल्या 3 हजार 500 कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या करण्याचा विचारही सरकार करत आहे. दुसरीकडे संपकरी कर्मचारी आणि नेते आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काल परिवहन मंत्री अनिल परब यांच्याशी चर्चा केली आणि काही पर्याय सूचवले आहेत. त्यामुळे संपाचा तिढा कसा सुटणार हा प्रश्न अजूनही कायम आहे.


कोल्हापुरात एस टी कर्मचाऱ्यांचे बाराव्यादिवशी  आंदोलन तीव्र


कोल्हापुरात एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन तीव्र झालंय. आंदोलनाच्या बाराव्या दिवशी एसटी कर्मचाऱ्यांनी जलसमाधी घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलीस आणि आंदोलकांमध्ये झटापट झाली. या संघर्षात एका महिला एसटी कर्मचाऱ्याला भोवळ आली. पोलिसांनी काही आंदोलकांना ताब्यात घेतलं. यावेळी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. 


एसटी महामंडळाने आतापर्यंत 2 हजार 178 कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे. दरम्यान मंगळवारी एसटी महामंडळाचे सुमारे साडेसात हजार कर्मचारी कामावर हजर झाले.  एसटीची हजेरी पटावरील एकूण कामगारांची संख्या 92 हजार 266 आहे. तर सध्या हजर कर्मचाऱ्यांची संख्या  7 हजार 400 आहे. यामध्ये प्रशासकीय 5224 कर्मचारी, 1773 कार्यशाळा कर्मचारी, 264 चालक आणि 139 वाहक आहेत.  प्रत्यक्षात संपामध्ये भाग घेतलेल्या कर्मचाऱ्यांची संख्या 84, 866 आहे. 


 


संबंधित बातम्या :



ST Workers Strike : बुलडाण्यातील विष घेतलेल्या एसटी कर्मचाऱ्याचा मृत्यू, महामंडळाच्या अल्टिमेटमनंतरही आंदोलन सुरुच


ठाकरे सरकारला जागे करण्यासाठी लढा आणखी तीव्र करावा लागेल; केंद्रीय मंत्री रामदास आठवले


युपी पॅटर्न कसा आहे? एसटीला तोट्यातून बाहेर काढण्यासाठी 'युपी पॅटर्न' राबवण्याचा निर्णय