ST Workers Strike : एसटी संपातून माघार घेत पुन्हा कामावर रूजू झालेल्या कर्मचाऱ्यांविरोधात कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले असल्याचे पत्र व्हायरल झाल्यानंतर एसटी कर्मचाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली. या पत्रावर एसटी महामंडळाने या पत्राबाबत खुलासा केला असून हे पत्र बोगस असल्याचे म्हटले आहे. या प्रकरणी एसटी महामंडळाकडून पोलिसांमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे.
वेतनवाढ, एसटी महामंडळाचे विलीनीकरण आदींसह विविध मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू होते. सरकारने विलीनीकरण वगळता वेतनवाढीसह इतर मागण्या मान्य केल्या होत्या. त्यानंतर कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर रूजू होण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर अनेक कर्मचारी कामावर पुन्हा परतले होते. या कर्मचाऱ्यांवर कोणतीही कारवाई होणार नसल्याचे आश्वासन सरकारने दिले होते. मात्र, व्हायरल होणाऱ्या पत्रामुळे एसटी कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली.
व्हायरल होणाऱ्या पत्रात काय ?
एसटी महामंडळाचे कर्मचारी वर्गाचे महाव्यवस्थापक माधव काळे यांच्या सहीने एक परिपत्रक व्हायरल होत आहे. या पत्रानुसार, अधिकाधिक एसटी कर्मचारी पुन्हा कामावर रुजू झाल्यानंतर आणि एसटी वाहतूक सुरळीतपणे सुरू झाल्यानंतर 29 ऑक्टोबर 2021 ते 10 मार्च 2022 पर्यंत संपात सहभागी असलेल्या कर्मचाऱ्यांवर पुढील कार्यवाही करण्याचे आदेश एसटी महामंडळाच्या विभागांना देण्यात आले होते.
एसटी महामंडळाने काय म्हटले?
एसटी महामंडळाने व्हायरल होणाऱ्या पत्रावर खुलासा केला आहे. हे परिपत्रक पूर्णत: खोटे व बनावट असून कर्मचाऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. कामावर परतणाऱ्या कर्मचाऱ्यांना पुन्हा रूजू होण्यापासून अटकाव करण्यासाठी हे बनावट पत्र व्हायरल केले असल्याचे एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी म्हटले. एसटी महामंडळाने या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. येत्या 10 मार्च 2022 पर्यंत कामावर रुजू होणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कोणतीही कारवाई करणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
इतर महत्त्वाच्या बातम्या:
- एसटी महामंडळाच्या विलिनीकरणाबाबत त्रिसदस्यीय समितीच्या तीन महत्त्वाच्या शिफारसी, अहवाल एबीपी माझाच्या हाती
- उत्तरप्रदेशात 1986नंतर एसटीचं कुठलंही आंदोलन नाही; महामंडळ फायद्यात - काय आहेत कारणं?
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha