मुंबई : सामान्य माणसांसाठी महत्वाची बातमी आहे. काही दिवसांपासून आपल्या विविध मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संप अखेर मागे घेतला आहे.  आपल्या मागण्यांसाठी आक्रमक झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या काही मागण्या अखेरीस सरकारनं मानल्या आहेत.  त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन मागे घेतलं आहे. एस टी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 12 वरून 28 टक्क्यांवर वाढवण्यात आलाय तसंच घरभाडे भत्त्यातही वाढ केलेली आहे. आज मंत्री अनिल परब आणि एसटी कर्मचारी संघटनांची मंत्रालयात बैठक झाली त्यात काही मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत. तर उर्वरीत मागण्यांबाबत दिवाळीनंतर निर्णय घेणार असल्याचं मंत्री अनिल परब यांनी सांगितलं. 




 एसटी कामगारांना 28 टक्के महागाई भत्ता आणि वाढीव घरभाडे भत्ता देण्याचे सरकारने मान्य केलं आहे.  परिवहनमंत्री अनिल परब यांच्यासोबतच कामगार संघटनांची बैठक झाली. या बैठकीत मागण्यांवर तोडगा निघाला. त्यानंतर  एसटी कामगारांचे आंदोलन मागे घेण्यात आले.  सरकारच्या निर्णयानंतर 28 कोटी महागाई भत्ता आणि  2 कोटी घरभाडे असा 30 कोटी रूपयांचा भार दर महिन्याला एसटी महामंडळावर पडणार आहे.


कृती समितिनं दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की, मंत्री अनिल परब यांच्यासोबत झालेल्या बैठकीत वार्षिक वेतनवाढीचा दर दोन टक्क्यांवरुन तीन टक्के करण्यावरही सकारात्मक चर्चा झाली. तसेच आंदोलनात सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांवर कोणतीही कारवाई केली जाणार नाही, असं आश्वासनही देण्यात आलं आहे. 


प्रलंबित मागण्यासाठी एसटी कर्मचारी दोन दिवसांपासून उपोषणास बसले होते.  मात्र काल यावर तोडगा न निघाल्याने कालपासून कामावर न जाण्याचा निर्णय एसटी कर्मचाऱ्यांनी घेतला आहे. मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही एसटी बाहेर काढणार नाही या निर्णयावर एसटी कर्मचारी ठाम होते. 


काय आहेत एस टी कर्मचाऱ्यांच्या मागण्या



  • महागाई भत्ता देण्यात यावा

  • वार्षिक वेतनवाढ ही दोनवरून टक्क्यांवरून तीन टक्के करण्यात यावी

  •  घरभाडे भत्ता 8, 16, 24 % प्रमाणे देण्यात यावे

  • दिवाळीपूर्वी वेतन मिळावे 



 


महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ राज्य शासनात विलीन करून एसटीच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना न्याय द्या अन्यथा संप करू असा इशारा ऐन दिवाळीत महाराष्ट्र राज्य कनिष्ठ वेतन श्रेणी एस टी कर्मचारी संघटनेने थेट मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे दिला होता. त्यामुळे  ऐन दिवाळीत एसटी कर्मचाऱ्यांनी संप केल्यामुळे तर राज्यातील ग्रामीण भागात प्रवाशांचे मोठे हाल होण्याची शक्यता निर्माण झाली  होती.