धुळे : खाजगी प्रवासी वाहतुकीला तोडीस तोड म्हणून एसटीमध्येही काही बदल होत आहेत. शिवनेरी, अश्वमेधनंतर शिवशाही बस त्याचाच एक भाग. आता प्रवाशांना रात्री लांब पल्ल्याचा प्रवास झोपून करता यावा यासाठी एसटी महामंडळ विनावातानुकूलित शयनयान बस आणत आहे.

पुण्यातील मध्यवर्ती कार्यशाळेत विनावातानुकूलित शयनयान असलेल्या बसच्या (नॉन एसी स्लीपर कोच बस) निर्मितीचं काम सुरु आहे. येत्या वर्षभरात साधारण एक हजार विना वातानुकूलित शयनयान बसेस प्रवाशांच्या सेवेत दाखल होतील.

टू बाय वन, 30 शयन कोच असणारी ही बस पुण्यातील सीआयआरटी या संस्थेकडून प्रमाणित करुन त्यानुसार बांधणी सुरु आहे. लवकरच या बस प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहेत. या विनावातानुकूलित शयनयान बससाठी एसटीचेच चालक, वाहक असतील, अशी माहिती एसटीच्या सूत्रांनी दिली.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या रातराणी प्रकारात सुरु असलेल्या एसटीच्या सहाशे बससाठी असलेली भाडेआकारणी या नवीन विना वातानुकूलित शयनयान बससाठी होऊ शकते. म्हणजेच एसटीच्या रातराणी बसला जितकं भाडं प्रवाशांना द्यावं लागतं तितकंच किंवा त्यापेक्षा थोडं जास्त भाडं एसटीच्या या नव्या विना वातानुकूलित शयनयान बससाठी आकारलं जाऊ शकतं.  मात्र या संदर्भात अंतिम निर्णय अद्याप झालेला नाही.

परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांच्या प्रयत्नातून सुरु झालेल्या वातानुकूलित शिवशाही बस सेवेनंतर लवकरच विना वातानुकूलित शयनयान बसेस एसटीच्या ताफ्यात दाखल होणार आहे. लाल परी म्हणून ओळख असलेली एसटी आता बदलत आहे हे यावरुन पुन्हा एकदा अधोरेखित झालं आहे.