मुंबई : आषाढी यात्रेसाठी एसटीने तब्बल 3 हजार 678 जादा बस सोडल्या आहेत. भाविक प्रवाशांच्या सोयीसाठी ग्रुप बुकिंग, अॅडव्हान्स बुकिंग तसेच प्रत्यक्ष बसस्थानकावर करंट बुकिंगची सुविधाही उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
राज्यभरातून आषाढी यात्रेसाठी लाखो भाविक पंढरपूरला जातात. त्यापैकी बहुतांश येताना पायी दिंडीने येतात पण आषाढी यात्रा झाली की, व्दादशीला म्हणजे 5 तारखेला अनेक भाविक परतीच्या प्रवासासाठी एसटी बसने निघतात. त्यांच्या सोयीसाठी पंढरपूर येथे मुख्य बसस्थानकातून काही अंतरावर तात्पुरते स्थानक उभारून तेथून या जादा बसेस विभागनिहाय सोडण्यात येणार आहेत.
या नव्या स्थानकात भाविक-प्रवाशांच्या सोयीसाठी प्रसाधनगृहे, उपाहारगृहे, विश्रांती कक्ष, झुणका-भाकर केंद्र, अखंडित वीज पुरवठा, स्वच्छ पाणी या सुविधा पुरविण्यात आल्या आहेत.
नवीन बसस्थानकातून मराठवाडा, विदर्भ, खान्देश, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात विभागनिहाय फलाट निर्माण करण्यात आले आहेत. भाविक प्रवाशांनी परतीच्या प्रवासासाठी या नवीन बस स्थानकातून प्रवास करावा, असं आवाहन एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक रणजीत सिंह देओल यांनी केलं आहे.