चंद्रपुरातील ताडोबा अभयारण्य 15 ऑक्टोबरपर्यंत बंद
एबीपी माझा वेब टीम | 01 Jul 2017 02:13 PM (IST)
चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील जगप्रसिद्ध ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प पुढील साडेतीन महिन्यांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. 1 जुलै पासून 15 ऑक्टोबर 2017 पर्यंत ताडोबा अभयारण्य पर्यटकांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय अचानक घेण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी ताडोबा प्रशासनाने वन्यजीव प्रेमींची मागणी आणि एनटीसीएच्या गाईडलाईन्स नुसार ताडोबा प्रकल्प पावसाळ्यात बंद ठेवावा असा प्रस्ताव वरिष्ठांकडे पाठवला होता. मात्र या प्रस्तावावर कुठलाच निर्णय न झाल्यामुळे ताडोबा प्रशासनाने 1 जुलैपासून ताडोबा पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय घेतला. ताडोबाच्या स्थापनेपासून पहिल्यांदाच पर्यटकांसाठी पावसाळ्यात व्याघ्र प्रकल्प बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अचानक ताडोबा बंद करण्यात आल्यामुळे पर्यटकांना मोठा मनःस्ताप सहन करावा लागणार आहे. ऑनलाईन बुकिंग झालेल्या पर्यटकांची रक्कम करणार परत केली जाणार आहे. मात्र पर्यटकांचं अॅडव्हान्स बुकिंग घेऊन ठेवणाऱ्या हॉटेल्सनाही या निर्णयाचा फटका बसू शकतो.