परभणी : जिंतूरमध्ये अंधश्रद्धा निर्मुलन समिती आणि भाजप आमने-सामने आले आहेत. स्मशानभूमीबद्दल सर्वसामान्य लोकांच्या मनातील भीती दूर व्हावी, या उद्देशाने अंनिसच्या पदाधिकाऱ्यांनी स्मशानभूमीत वाढदिवस साजरा केला, मात्र या गोष्टीचा निषेध करण्यासाठी भाजपने स्मशानभूमीचं शुद्धीकरण केलं. यावरुन जिंतूरमध्ये भाजप आणि अंनिसमध्ये वाद सुरु झाला आहे.

स्मशानात वाढदिवस साजरा

अंधश्रद्धा निर्मुलन समिती आणि पुरोगामी संघटनांनी 19 सप्टेंबर रोजी ‘अंनिस’च्या पदाधिकाऱ्याच्या मुलाचा वाढदिवस स्मशानभूमीत साजरा केला. या वाढदिवसाच्या कार्यक्रमाला स्मशानभूमीतच केक कापण्यात आला. मांसाहारासह जेवणही ठेवण्यात आले. परिसरातील अनेकांनी या कार्यक्रमाला हजेरीही लावली होती.

या कार्यक्रमामागे ‘अंनिस’चा उद्देश काय?

मांसाहार करुन स्मशानभूमीकडे जाऊ नये, रात्रीच्या वेळी स्मशानभूमीकडे फिरकू नये, यांसह अनेक अंधश्रद्धा आजही लोकांमध्ये आहेत. हेच हेरुन ‘अंनिस’ने लोकांच्या मनात स्मशानभूमीबाबत असलेली भीती दूर करण्याचे ठरवले. त्यातूनच थेट स्मशानभूमीत जाऊन वाढदिवस साजरा केला आणि स्मशानभूमीत जाण्यास घाबरु नये, असा संदेश दिला. लोकांनी निर्भयपणे जगावे, असा उद्देश ‘अंनिस’चा होता.

भाजपसह हिंदुत्त्ववादी संघटनांकडून स्मशानभूमीचं शुद्धीकरण

लोकांच्या मनातील भीती घालवण्यासाठी अंनिसने केलेल्या स्मशानभूमीतील वाढदिवसाच्या कार्यक्रमाला भाजपसह हिंदुत्त्ववादी संघटनांनी तीव्र विरोध केलाय. पुरोहित आणि हिंदू समाजातील महाराजांच्या उपस्थितीत स्मशानभूमीत गोमुत्र शिंपडून आणि मंत्रोच्चाराचा घोष करुन शुद्धीकरण करण्यात आलं. तसेच, स्मशानभूमीत मांसाहार करणाऱ्या अंनिसच्या कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणीही करण्यात आली.

दरम्यान, अंनिसने समाजप्रबोधनाच्या हेतूने केलेला कार्यक्रम हिंदुत्त्ववादी संघटनांनी आक्षेप घेतल्याने वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे.