ST Mahamandal News : एसटी महामंडळाला (ST) भरीव आर्थिक मदत न देता सरकारचा ठिगळे लावण्याचा प्रकार सुरु असल्याचा आरोप महाराष्ट्र एस. टी.कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे (Shrirang Barge) यांनी केला. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना दिवाळी भेट देण्यासाठी फक्त 45 कोटींची तरतूद केली असल्याचे ते म्हणाले. हा ठिगळे लावण्याचा प्रकार असून यातून फार काही साध्य झाले नसल्याच बरगेंनी म्हटलं आहे. तसेच कमी निधी प्राप्त झाल्यानं हक्काचा महागाई भत्ता मिळाला नसल्याचं त्यांनी म्हटलंय.
दिलेला निधी खूपच कमी, कर्मचारी समाधानी नाहीत
दरम्यान, यापूर्वी महामंडळाने 738.50 कोटी रुपये इतक्या निधीची मागणी शासनाकडं केली होती. पण त्यापैकी पहिल्यांदा फक्त 300 कोटी इतकी कमी रक्कम महामंडळाला सरकारने दिली आहे. आता त्यामध्ये भर घालून पुन्हा 45 कोटी रुपये दिले आहेत. पण यामध्ये कर्मचारी समाधानी नाहीत. गेली सात वर्षे कर्मचाऱ्यांना अडीच हजार व अधिकाऱ्यांना पाच हजार मिळत होते. त्यामध्ये कर्मचाऱ्यांच्या रकमेत अडीच हजारांची भर घालून कर्मचारी व अधिकारी हा भेदभाव कमी करण्याचा प्रयत्न केला असल्याचे बरगेंनी म्हटलं आहे. हे जरी असले तरी सात वर्षापूर्वीची महागाई व आताची महागाई यात जमीन अस्मानाचा फरक आहे. रेल्वे, महापालिका व बेस्टच्या तुलनेत ही भेट रक्कम खूपच कमी असल्याचे बरगेंनी म्हटलं आहे.
सरकारला या प्रश्नाचे गांभीर्य दिसत नाही
महामंडळातील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना दिवाळी भेट देण्यासाठी फक्त 45 कोटींची तरतूद केली आहे. ही तरतूद खूप कमी आहे. यामध्ये अजून वाढ केली असती तर बरे झाले असते असे बरगेंनी म्हटलं आहे. कारण मुळातच एसटी कर्मचाऱ्यांना वेतन कमी आहे. त्यात अजून वाढीव महागाई भत्ता मिळालेला नाही. सरकारनं अजून निधी दिला असता तर तो प्रश्न सुद्धा मिटला असता. पण तरीही सरकारला या प्रश्नाचे गांभीर्य दिसत नसल्याचं बगरेंनी म्हटलं आहे.
ST महामंडळाची आर्थिक स्थिती बिकट
एस.टी. महामंडळाची आर्थिक स्थिती बिकट झाली असून, सध्या दिवसाचे उत्पन्न फक्त 13 ते 14 कोटी इतके आहे. टक्केवारीचा विचार केला तर एसटीच्या 75 वर्षाच्या काळातील हा सर्वात निचांकी आकडा आहे. शिवाय अडीच हजार कोटींची देणी थकलेली आहेत. अशा परिस्थितीत महामंडळाला सदृढ करण्यासाठी मोठ्या रकमेच्या निधीची गरज आहे. आर्थिक अडचणीमुळे कर्मचाऱ्यांना वेतन, अपेक्षित दिवाळी भेट व थकीत महागाई भत्ता मिळण्यामध्ये अडचणी निर्माण होत आहेत.
अजूनही 753 कोटी इतकी रक्कम सरकारकडे प्रलंबीत
दरम्यान, सरकारनं सन 2022-23 च्या अर्थसंकल्पात 1450 कोटी व पुरवणी मागणीद्वारे 1000 कोटी अशी एकूण 2450 कोटींची तरतूद मंजूर केली आहे. त्यापैकी आतापर्यंत 1261.50 कोटी इतकी रक्कम महामंडळाला मिळाली आहे. त्यात आता पुन्हा 45 कोटी रुपयांची भर पडली आहे. अजूनही 753 कोटी इतकी रक्कम सरकारकडे प्रलंबीत आहे. ती दिली तर काही प्रमाणात देणी देता येतील व कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ करता येईल असे बरगेंनी म्हटलं आहे. बाजारात महागाईमध्ये प्रचंड वाढ झाली असल्यानं, त्या तुलनेत कर्मचाऱ्यांना मिळणारे वेतन तुटपुंजे असल्याने त्यांना कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे अडचणीचे ठरत आहे.
रक्कम तोडून तोडून देणं थांबवावं
ST कर्मचाऱ्यांना राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे महागाई भत्ता मिळतो. काही दिवसापूर्वी पाठवलेली २८ टक्केवरून 34 टक्के वाढ झालेला थकीत महागाई भत्ता देण्याची फाईल मंजुरीसाठी राज्य सरकारकडे प्रलंबित असताना त्यात आता पुन्हा राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात चार टक्क्यांनी वाढ झाली आहे. तो सर्व मिळून महागाई भत्ता दिला असता तर बरे वाटले असते, दिवाळी गोड झाली असती. पण तसे झाले नाही. त्यामुळे सरकारने अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आलेली शिल्लक रक्कम ST ला त्वरित द्यावी अशी मागणी बरगेंनी केली आहे. रक्कम तोडून तोडून देणे थांबवावे, ठिगळे लावण्याच्या प्रकारामुळं कर्मचाऱ्यांच्या व महामंडळाच्या हाती काहीही लागत नाही. हे सरकारने लक्षात घ्यावे असेही बरगेंनी म्हटलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
ST Mahamandal : राज्य सरकारची ST महामंडळाला 300 कोटी रुपयांची तातडीची मदत