मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांनी ऐन दिवाळीत पुकारलेला संप सुरु होऊन 24 तासांपेक्षा जास्त काळ उलटला आहे. आज कामावर न परतणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांचं निलंबन करण्यात येईल, असा इशारा प्रशासनानं दिला आहे.

संप पुकारणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांना सरकारनं अल्टिमेटम दिला आहे. तसंच निलंबित कर्मचाऱ्यांच्या जागेवर कंत्राटी कर्मचाऱ्यांची भरती करण्यात येईल, अशी तंबी देखील देण्यात आली आहे.

सोमवारी मध्यरात्रीपासून सुरु झालेल्या संपामुळे ऐन दिवाळीत गावी जाणाऱ्या सर्वसामान्यांचे हाल होत आहेत. सातव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी तातडीने करण्याच्या मागणीसह इतर मागण्यांसाठी एसटी कर्मचारी संघटनेनं राज्यव्यापी संप पुकारला आहे.

एसटी संप : पुढील 25 वर्ष सातवा वेतन आयोग लागू करु शकत नाही : रावते


पुढची 25 वर्ष एसटी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करु शकत नाही, त्यासाठी महामंडळाकडे पैसाच नाही, असं म्हणत परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी एसटी कर्मचाऱ्यांची मागणी धुडकावून लावली आहे. शिवाय एसटी कर्मचाऱ्यांचा संप बेकायदेशीर असून त्यामागे काँग्रेसचा हात असल्याचा गंभीर आरोपही रावतेंनी केला आहे.

राज्यभरातले अनेक एसटी डेपो बंद आहेत. एसटी ठप्प झाल्यानं दिवाळीसाठी घरी परतणाऱ्या प्रवाशांना पहाटेपासूनच मनस्तापाला सामोरं जावं लागलं.

एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रमुख 3 मागण्या :

  • एसटी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करावा

  • पदनिहाय वेतनश्रेणी द्यावी

  • जोपर्यंत कामगार, कर्मचाऱ्यांच्या वेतनाबाबत सुधारित करार होत नाही तो पर्यंत कर्मचारी, कामगारांना 25 टक्के हंगामी वाढ देण्यात यावी


LIVE: एसटीचा संप, दिवाळीला गावी जाणारे प्रवासी अडकले