धुळे : एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढी संदर्भात त्वरित योग्य निर्णय न घेतल्यास पुन्हा संपावर जाण्याचा अघोषित इशाराच देण्यात आला आहे.

१७ ते २० ऑक्टोबर २०१७ या कालावधीत वेतनवाढीच्या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी राज्यव्यापी संप पुकारला होता. त्यानंतर न्यायालयानं एसटी कर्मचाऱ्यांना किमान कामगार कायद्यानुसार वेतन मिळत नसल्यानं सरकारला फटकारलं होतं.

एसटी कर्मचाऱ्यांना वाढीव वेतन कसं देता येईल या संदर्भात अहवाल तयार करण्यासाठी एक उच्चस्तरीय समिती नेमण्यात आली होती. न्यायालयानं ही समिती नेमली असल्यानं न्यायप्रक्रियेच्या चाकोरीत राहून ही उच्चस्तरीय समिती सकारात्मक मार्ग काढेल अशी एसटी कर्मचाऱ्यांची आशा होती. मात्र, या समितीनं ही आशा साफ फोल ठरवली.

यासंदर्भात एसटी कर्मचाऱ्यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त करत सरकारनं एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढी संदर्भात त्वरित योग्य निर्णय न घेतल्यास पुन्हा संपावर जाण्याचा अघोषित इशाराच दिला आहे. या संदर्भातला अंतिम निर्णय १९ जानेवारीला मुंबईत होत असलेल्या कृती समितीच्या बैठकीत होणार असल्याचं संघटनेनं एका प्रसिद्धी पत्रकात नमूद केलं आहे.