एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीवर सकारात्मक निर्णय होणार?
एबीपी माझा वेब टीम | 31 Mar 2018 10:03 PM (IST)
परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या अध्यक्षतेखाली एसटीच्या जवळपास 21 कामगार संघटनांच्या प्रतिनिधींसोबत सोमवारी मुंबईत दुपारी दोन वाजता बैठक होणार आहे.
फाईल फोटो
धुळे : एसटी कर्मचाऱ्यांचा गेल्या दोन वर्षांपासून रखडलेल्या पगारवाढीचा प्रश्नावर सोमवारी (2 एप्रिल) सकारात्मक निर्णय होण्याची शक्यता आहे. परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या अध्यक्षतेखाली एसटीच्या जवळपास 21 कामगार संघटनांच्या प्रतिनिधींसोबत सोमवारी मुंबईत दुपारी दोन वाजता बैठक होणार आहे. या बैठकीत रखडलेला कामगार करार मार्गी लागण्याची शक्यता आहे. या बैठकीबाबत एसटीच्या सुमारे सव्वालाख कर्मचाऱ्यांमध्ये उत्सुकता लागून आहे. वेतनवाढ संदर्भात मान्यताप्राप्त संघटना असलेल्या एसटी कामगार संघटनेनं ऐन दिवाळीच्या हंगामात चार दिवसांचा संप पुकारून कर्मचाऱ्यांच्या पदरी निराशाच आली. इतकंच नाही तर एसटी कर्मचाऱ्यांमध्ये संघटनांच्या भूमिकांबाबत असलेला असंतोष पाहता, दोन एप्रिलच्या बैठकीत एसटी कर्मचाऱ्यांचा हिताचा विचार करता जे पदरात पडेल ते अगोदर पदरात पाडून घेण्याचा आता सर्वच संघटनांचा प्रयत्न आहेत. त्यामुळे दिवाकर रावते यांनी एसटी कर्मचाऱ्यांसाठी घेतलेल्या पुढाकाराला या 21 संघटना कसा प्रतिसाद देतात, हे 2 एप्रिलला दुपारी दोन वाजताच समजेल. या बैठकीत संघटनांनी आडमुठेपणाची भूमिका घेतली, तर त्या संघटनांना कर्मचाऱ्यांच्या असंतोषचा सामना करावा लागेल, अशी चर्चा एसटी कर्मचाऱ्यांमध्ये सुरू आहे. दरम्यान, दिवाकर रावते यांनी सभागृहात एसटीबद्दल केलेल्या विधानासंदर्भात उच्च न्यायालयात दाखल याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयात दोन एप्रिलला कामकाज होण्याची शक्यता आहे.