मुंबई : आयसीआयसीआय बँक आणि व्हिडीओकॉन ग्रुपमधील कथित वादग्रस्त व्यवहारांवर पहिल्यांदाच व्हिडीओकॉनचे संचालक वेणुगोपाल यांनी आपली बाजू मांडली. "व्हिडीओकॉनचं एकेकाळी मोठं नाव होतं. पण या प्रकरणामुळे व्हिडीओकॉनच्या प्रतिष्ठेला धक्का बसला असून, मराठी उद्योजकाला अडचणीत आणण्याचा प्रयत्न सुरु आहे." असा आरोप वेणुगोपाळ धूत यांनी केला. त्यांनी एबीपी माझाला एक्स्क्लुझिव्ह मुलाखत दिली.
आयसीआयसीआय बँकेच्या सीईओ चंदा कोचर यांचे पती दीपक कोचर आणि व्हिडिओकॉनचे सर्वेसर्वा वेणुगोपाल धूत यांच्यातील व्यावसायिक भागीदारीमुळे त्यांना आयसीआयसीआयने 3 हजार 250 कोटींचं कर्ज दिल्याचा आरोप झाला. या आरोपानंतर कॉर्पोरेट विश्व ढवळून निघालं. या आरोपानंतर सीबीआयनं याबाबत प्राथमिक चौकशी सुरू केली आहे.
सुप्रीम एनर्जी आणि दीपक कोचर यांच्या व्यवहाराबाबत आपल्याला काहीही माहिती नसल्याचं धूत यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितलं.
तसेच “पुंगलिया आणि कोचर यांच्याशी माझं काहीही देणं-घेणं नाही. मला 20 बँकांनी कर्ज दिलं आहे. तेव्हा जर मला गैरव्यवहार करायचा असता, तर फक्त आयसीआयसीआय बँकेसोबतच का करेन?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
ते पुढं म्हणाले की, “व्हिडीओकॉनचं एकेकाळी मोठं नाव होतं. पण या प्रकरणामुळे कंपनीच्या प्रतिष्ठेला धक्का बसला आहे. वास्तविक, एका मराठी उद्योजकाला अडचणीत आणण्याचा डाव आहे. पण तरीही आम्ही यातून बाहेर पडू, व्यावसायाची पुनर्रचना करु,” असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
शिवाय, व्हिडीओकॉनमध्ये सध्या कार्यरत असणाऱ्या कुणाच्याही नोकऱ्या जाणार नाहीत. असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.
व्हिडीओ :
https://www.facebook.com/abpmajha/videos/10160387650475271/