बारामती : एसटी कामगारांच्या प्रलंबित वेतन कराराचा प्रश्न मार्गी लागावा या मागणीसाठी एका एसटी कर्मचाऱ्याने बारामती ते मुंबई पायी वारी सुरु केली आहे. बारामती आगाराच्या कार्यशाळेतील मोहन दिगंबर चावरे पायी मुंबईला चालत येऊन सरकारपुढे एसटी कर्मचाऱ्यांची व्यथा मांडणार आहेत.


बारामती आगारातील दत्त मंदिरात दर्शन घेऊन चावरे यांनी मुंबईकडे पायी वारीसाठी प्रस्थान केलं. एसटी कामगारांच्या वेतन करारासंबंधी वारंवार पाठपुरावा केला जात असताना त्याकडे दुर्लक्ष केलं जात आहे. त्यामुळे पायी वारीच्या माध्यमातून मुख्यमंत्री निवासस्थानी जाऊन त्यांच्यापर्यंत कामगारांची व्यथा पोहोचवण्याचं काम चावरे करणार आहेत.

एसटी कर्मचाऱ्यांना अत्यंत तुटपुंजा पगार मिळतो. शासन वेतन कराराबाबत सातत्याने चालढकल करतं. अशा परिस्थितीत कुटुंब जगवायचं कसं, असा प्रश्न  कामगारांना पडला आहे. यात कोणतंही राजकारण न करता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तोडगा काढावा, अशी मागणी चावरे यांनी केली. गेल्या तीन महिन्यांपासून चावरे हे मुख्यमंत्री आणि परिवहन मंत्री दिवाकर रावते यांना पत्रव्यवहार करत आहेत. पण त्यांना याबाबत ठोस उत्तर मिळालं नाही.

बारामतीतून निघालेले चावरे जेजुरी, सासवड, स्वारगेट, पिंपरी चिंचवड, लोणावळा, खोपोली, पनवेल या ठिकाणी मुक्काम करत 29 मार्च रोजी सायंकाळी मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या बंगल्यावर पोहोचतील. सध्या ते स्वारगेटला असून त्यांचा आज पुण्यात मुक्काम आहे.