Maharashtra ST Employee Protest : एसटी महामंडळाचे (MSRTC) शासनामध्ये विलनीकरण करण्यात यावे या प्रमुख मागणीसाठी एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी राज्यात काही ठिकाणी ऐन दिवाळीत संप पुकारला आहे. सणासुदीच्या काळात या संपामुळं प्रवाशांचे मात्र हाल होत आहेत. दुसरीकडे एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत औद्योगिक न्यायालयाने दिलेल्या निर्देशाची मुंबई उच्च न्यायालयानेही गंभीर दखल घेतली आहे. आज यावर हायकोर्टात सुनावणी होणार आहे. गेल्या काही दिवसांपासून आपल्या विविध मागण्यांसाठी एसटी कर्मचारी आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत. सरकारने त्यांच्या काही मागण्या पूर्ण केल्या आहेत. मात्र आता महामंडळाचे शासनात विलनीकरण करावे यासाठी पुन्हा आंदोलनाला जोर मिळण्याची शक्यता आहे.
भिवंडीत बस डेपोत एसटी कर्मचाऱ्यांचा संप
भिवंडी बस डेपोत एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचा पुन्हा संप सुरू झाल्याने प्रवाशांचे हाल होत आहे. एसटी महामंडळाचे शासनामध्ये विलनीकरण करण्यात यावे या प्रमुख मागणीसाठी एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी एन दिवाळीत संप पुकारला आहे तसेच ही काळी दिवाळी असल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले. या आंदोलनादरम्यान कर्मचाऱ्यांनी राज्य सरकार, परिवहन मंत्री अनिल परब तसेच एसटी महामंडळाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. एसटी महामंडळाच्या धोरणामुळे अनेक कर्मचारी आत्महत्या करत असल्याचा आरोपही यावेळी कर्मचाऱ्याने लावला आहे. तर ही दिवाळी आमची काळी दिवाळी असल्याचे देखील कर्मचारी म्हणाले. आपली समस्या मांडत असताना त्यांच्या डोळ्यात अश्रूही अनावर झाले. जोपर्यंत एसटी महामंडळाचे शासनामध्ये विलीनीकरण करण्यात येत नाही, तोपर्यंत हे आंदोलन सुरू राहील अशी भूमिका एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी घेतली आहे. तसेच एसटी महामंडळाच्या या संपामुळे अनेक प्रवाशांचे हाल झाले आहेत. तर दुसरीकडे रिक्षा चालकांनी भाव वाढ करून लूट करत असल्याने प्रवासी त्रस्त झाले आहेत.
'लालपरी'नं उभ्या महाराष्ट्राला साथ दिली, तिच्या चालकांवर आयुष्याचा प्रवास संपवण्याची वेळ, भाजप नेते
गेवराई आगारातून एकही बस आज बाहेर गेली नाही
एसटीला राज्य सरकारमध्ये विलीन करून घ्यावं या मागणीसाठी बीड जिल्ह्यातल्या गेवराई आगारातून एकही बस आज बाहेर गेलेली नाही. एसटी कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्यासाठी आज आंदोलन तीव्र केलं असून जोपर्यंत एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार असल्याचा पवित्रा या कर्मचाऱ्यांनी घेतला आहे. गेवराईच्या बस स्थानकात बाहेरून आलेल्या गाड्या या कर्मचाऱ्यांनी अडवून धरल्या आहेत. दिवाळीच्या सणादिवशीच हे आंदोलन सुरू असल्याने प्रवाशांचे मात्र मोठे हाल होत आहेत. अनेक प्रवासी बस स्थानकात आले आहेत मात्र या ठिकाणी आंदोलन सुरू असल्याने पूर्ण बस गाड्या बंद आहेत. त्यामुळे प्रवाशांना आता मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागतोय. बीड जिल्ह्यातल्या आष्टी, धारूर, परळी आणि गेवराईमध्ये अशा पद्धतीचे तीव्र आंदोलन सुरु आहे.
दिवाळीचा सण तोंडावर असतानाच दोन एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या त्यामुळे हे आंदोलन आता चिघळलं आहे. ज्या कामगार संघटना आहेत त्या संघटनांनी आमचा घात केला असा आरोप या कर्मचाऱ्यांनी केला आहे. त्यामुळे जोपर्यंत पगार वाढ आणि एसटीचं राज्य शासनामध्ये विलीनीकरण होत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार असल्याचं कर्मचाऱ्यांनी सांगितलं आहे.
एसटी कर्मचाऱ्यांचा संप मागे घ्या- उच्च न्यायालयाचे कामगार संघटनांना निर्देश
एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत औद्योगिक न्यायालयाने दिलेल्या निर्देशाची मुंबई उच्च न्यायालयानेही गंभीर दखल घेतली आहे. दिवाळीच्या तोंडावर विविध कामगार संघटनांनी आज मध्यरात्रीपासून पुकारलेल्या संपामुळे प्रवाशांची होणारी गैरसोय पाहता कामगार संघटनांनी पुढील आदेशापर्यत संप मागे घ्यावा , असे स्पष्ट निर्देश उच्च न्यायालयाने दिले आहेत. दरम्यान, संपाचे गांभीर्य लक्षात घेऊन उच्च न्यायालयात आज सकाळी 11 वाजता पुन्हा सुनावणी घेण्याचे ठरवले आहे.