अहमदनगर: शेवगाव तालुक्यात बारा फूट लांबीची मगर पकडण्यास यश आलं. क्रेनच्या मदतीनं पिंजरा लावून विहिरीतून मगर बाहेर काढण्यात आली.


बाभूळगाव परिसरात वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी मोठ्या शर्थीनं मगर बाहेर काढली. शेतात मगर आढळल्यानं परिसरातल्या शेतकऱ्यांत भयभीतता पसरली होती. शेतकऱ्यांच्या माहिती नंतर वनविभागानं मगर पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र मगर शेजारील विनाकठड्याच्या विहरत पडली.



विहिरीची खोली जास्त असल्यानं पाणी उपसा करुन पाणी कमी करण्यात आलं. त्यानंतर विहरीत पिंजरा सोडून त्यामध्ये भक्ष्य ठेवण्यात आलं.



भक्ष्य पाहताच मगरीनं पिंजऱ्यात प्रवेश केला. त्यानंतर तातडीने पिंजरा बंद करुन मगरीला जेरबंद करण्यात आलं.
दरम्यान ही मगर जायकवाडीच्या जलसाठ्यातून आल्याची शक्यता आहे. मात्र यामुळं परिसरात अजूनही काही मगरी असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळं शेतकऱ्यांत काहीसं भितीचं वातावरण आहे.