भिवंडी : रिक्षाचालकांनी केलेल्या बेदम मारहाणीत एसटीचालकाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना भिवंडीत उघडकीस आली आहे. रिक्षाचालकांच्या मुजोरीमुळे घडलेल्या या घटनेमुळे संताप व्यक्त केला जात आहे.
एसटी बसचालक प्रभाकर गायकवाड बुधवारी रात्री ड्युटीवर होते. डेपोमध्ये बस नेत असताना गेटजवळ रिक्षा उभी होती. त्यावेळी गायकवाड यांनी चालकाला रिक्षा हटवण्यास सांगितलं. रिक्षाचालकाने त्यांना न जुमानता रिक्षा हलवली नाही. त्यावेळी एसटी आत नेताना रिक्षाला बसचा धक्का लागला.
याच रागातून रिक्षाचालकाने गायकवाड यांना जाब विचारला. दोघांमध्ये बाचाबाची सुरु झाली आणि आजुबाजुचे रिक्षाचालकही मदतीला आले. सर्व रिक्षाचालकांनी एसटी चालक प्रभाकर गायकवाड यांना बेदम मारहाण केली.
या घटनेची तक्रार करण्यासाठी गायकवाड पोलिस स्थानकात गेले असता तिथेच चक्कर येऊन कोसळले. त्यांना तातडीने रुग्णालय दाखल करण्यात आलं, मात्र उपचारांदरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या घटनेच्या निषेधार्थ भिवंडीमध्ये बसचालकांनी संप पुकारला आहे.